बोदवड सिंचन योजना रखडली

बोदवड सिंचन योजना रखडली
बोदवड सिंचन योजना रखडली

जळगाव  : जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी केंद्राकडून मंजूर निधीपैकी उर्वरित ४३३ कोटी ४४ लाखांचा निधी राज्याला मिळेल. या प्रकल्पाच्या कामाला गती येईल, असे सांगितले जात होते. परंतु, योजनेच्या कामाला गती आली नाही. शिवाय तापी नदीवरील महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प व जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यातील बलून बंधारे प्रकल्पाबाबतही कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. फक्त घोषणांचा पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यास के. एम. बापू पाटील यांच्यानंतर जलसंपदामंत्रीपद मिळाले आहे. बापू राज्यमंत्री होते. पण त्यांनी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव भागात लहान प्रकल्प, मध्यम प्रकल्पांबाबत काम केले. लहान प्रकल्प लवकर पूर्ण होतात. निधी आणणे शक्‍य होते, म्हणून लहान व शेतकऱ्यांना पूरक असे प्रकल्प उभारण्याचा व्यासंग त्यांनी जोपासला.

अलीकडेच जिल्ह्यात माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या रुपाने तापी पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाले. पाटील हे आवर्षणप्रवण पारोळा तालुक्‍यातील आहेत. गिरणा, अंजनी, बोरी भागातील जलसंकट गंभीर आहे. सुरत, भरूच (गुजरात) येथे अनेक शेतकरी कुटुंबातील युवकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते, याची जाणीवही त्यांना आहे. अशा स्थितीत बलून बंधारे प्रकल्प पूर्ण करण्याची अपेक्षा वाढली आहे. 

हे सात बंधारे पूर्ण झाल्यास गिरणा पट्टा हिरवागार होईल. टंचाईची समस्या किमान १०० गावांमध्ये नसेल. सुमारे ४२०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल. जवळपास ७११ कोटी निधी त्यासाठी हवा आहे. 

योजनेसाठी वर्ष २०१२ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने ५०० कोटी रुपये विशेष सहायता निधी म्हणून मंजूर केला. यानुसार २०१४ -१५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली. त्यापैकी केंद्राकडून प्रत्यक्ष ६६.६६ कोटींचा निधीच राज्याला प्राप्त झाला. यानंतर निधी न मिळाल्याने प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावला. हा प्रकल्प वर्ष २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. परंतु काम संथ गतीने सुरू असल्याने ते वेळेत पूर्ण होईल, असे दिसत नाही. 

ही योजना १९३ दशलक्ष घनमीटर क्षमतेची आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील ४२ हजार ४२० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पासंबंधी दिवाळीपूर्वी सर्वेक्षणासंबंधी काम सुरू होते. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीनंतर या प्रकल्पाबाबतच्या हालचाली मंदावल्याचे चित्र आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com