नगर जिल्ह्यात कापसावर घोंघावतेय बोंड अळीचे संकट

बोधेगाव परिसरातील एका प्लॉटवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसला. मात्र तो नुकसानपातळीच्या खाली आहे. त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घ्यावी. - किरण मोरे, तालुका कृषी अधिकारी, शेवगाव, जि. नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः तीन वर्षांपूर्वी कापूस उत्पादकांना जेरीस आणणाऱ्या गुलाबी बोंड अळीचे संकट यंदाही कापसावर घोंगावत आहे. बोधेगाव परिसरात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे या भागातील कापूस पिकाची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. 

गुलाबी बोंड अळी यंदा पुन्हा आढळल्याने बीटी बियाणांवर तिचा प्रादुर्भाव नसल्याचा बियाणे कंपन्यांचा दावा यंदाही फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी वर्षभरात बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य यशस्वी ठरले. गेल्यावर्षी कापसाचे क्षेत्र फारसे नव्हते. त्यामुळे बोंड अळीच्या जागृतीकडे जिल्ह्यातील कृषी विभागाने फारसे लक्ष दिलेच नाही. 

विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुख पीक असलेल्या कापसाचे क्षेत्र नगर जिल्ह्यातही वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात एक ते दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. यंदा आतापर्यंत एक लाख दहा हजार क्षेत्रावर लागवड केली आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड या तालुक्यांत कापसाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यभरात कापसावर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने सुमारे ८० ते ९० टक्के पीक वाया गेले होते.

नगरमध्ये सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्र बोंड अळीने बाधीत झाले होते. त्याची नुकसानभरपाई देताना सरकारवर मोठा आर्थिक भार पडला होता. त्यानंतर कृषी विभाग, राज्य शासनासह विविध कंपन्यांकडून बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागृतीसह अनेक उपाययोजना केल्या आणि एक वर्षात बोंड अळीचे नियंत्रण करण्यात आले. या नियंत्रणात राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला. यंदा मात्र पुन्हा हे संकट घोंगावत असल्याचे उघड झाले आहे. 

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव शिवारातील अनेक ठिकाणी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत माहिती मिळताच शेवगावचे तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, बोधेगाव मंडळाचे कृषी अधिकारी सुभाष भराट, कृषी सहायक अजय देशमुख, गजानन चव्हाण, सुभाष बारगजे यांनी बोधेगाव शिवारात कपाशी क्षेत्राची पाहणी केली. काही ठिकाणी बोंडे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या कपाशीची डोमकळी फोडून पाहिली असता त्यात बोंड अळीचे पतंग आणि बोंड अळी आढळून आले असल्याचे निदर्शनास आले. या अळीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास उद्रेक होऊन मोठे नुकसान होण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, बोंड अळीचा यंदा पुन्हा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असताना कपाशीवर बोंड अळीसह कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com