बोंड अळी सर्वत्रच

बोंडअळी
बोंडअळी

पुणे: शेतकऱ्यांना लवकर बियाणे न विकण्याची कंपन्यांना तंबी, कोट्यवधी रुपयांचा प्रसारप्रचारावर खर्च करूनही यंदादेखील गुलाबी बोंड अळीचे राज्यभर आक्रमण झालेले आहे. बोंड अळीच्या संभाव्य नुकसानीचा अंदाज अजून तरी काढता येणार नाही, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.  कपाशीच्या पिकांमध्ये बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडली असलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, गेल्या हंगामाइतका प्रादुर्भाव अद्याप नसला तरी पुढे या गावांच्या संख्येत किती वाढ होईल याचा अंदाज आम्हाला आलेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  गुलाबी बोंड अळी नियंत्रणाकरिता कृषी विभाग सर्व पातळ्यांवर धडपड करतो आहे. त्यामुळेच आतापर्यंत सव्वाचार लाख सापळे लावले गेले आहेत. मात्र, प्रयत्न करूनही काही गावांमध्ये आर्थिक नुकसान पातळीच्यावर बोंड अळी पसरली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  फवारणीद्वारे बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचे कीटकनाशक वाटली जात आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दीड हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. बोंड अळीमुळे यंदा निश्चित किती नुकसान होईल, याचा अंदाज कृषी खात्याला आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.  कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी बोंड अळीसाठी सुरवातीपासून उपाययोजना केलेल्या आहेत. कापूस उत्पादक पट्ट्यातील ग्रामपंचायतींना बोंड अळी नियंत्रण मोहिमेत सहभागी करून घ्या, तसेच गावागावात फिरून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला आणि दिलासा द्या, अशा सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत.  गुलाबी बोंड अळीने गेल्या हंगामात ३४ लाख ३५ हजार हेक्टरवरील कपाशीचा फडशा पाडला होता. त्यामुळे १३ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. यंदा काही भागात गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीची उत्पादकता घटू शकते. मात्र, पुढील दोन महिन्यानंतर उत्पादकेतेविषयी चित्र स्पष्ट होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. चालू हंगामात शेतकऱ्यांनी ४० लाख हेक्टरच्या आसपास कपाशीचा पेरा केला आहे. बोंड अळी तसेच बोगस बियाणे यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसण्याची शक्यता आहे.  क्रॉपसॅपच्या माध्यमातून आम्ही गुलाबी बोंड अळीचे सर्वेक्षण राज्यभर हाती घेतले आहे. सामूहिक नियंत्रणासाठी सध्या २० जिल्ह्यांमध्ये चार लाख २० हजार सापळे देण्यात आलेले  आहेत. सापळ्यातील ल्युअर्स मुदतीत न बदल्यात या सापळ्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे आम्ही आम्ही साडेबारा लाख ल्युअर्स पुरविले आहेत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  अनेक जिल्ह्यांत प्रादुर्भाव बोंड अळीने आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात दोन, नगर जिल्ह्यात ३० , सोलापूर एक, औरंगाबाद जिल्ह्यात १५, बीड १६, जालना दोन, हिंगोली ८, हिंगोली ९, लातूर २, उस्मानाबाद ३, परभणी ४५, नांदेड २५, अकोला १३, अमरावती ३, बुलडाणा ३८, वाशीम ७, यवतमाळ २२, नागपूर १०, चंद्रपूर ५, तर वर्धा जिल्ह्यात एकूण १२ गावांमधील कपाशीच्या क्षेत्रात आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडली आहे.   यंदाही कंपन्यांच्याविरोधात कारवाईची शक्यता बोंड अळीमुळे यंदा शेतकऱ्यांचे जादा नुकसान झालेच तर संबंधित कापूस उत्पादक कंपन्यांच्या विरोधात महाराष्ट्र कापूस बी-बियाणे कायदा २००९ मधील तरतुदीप्रमाणे कारवाई होण्याची शक्यता यंदाही आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी पंचनामेदेखील करावे लागतील. याबाबत अंतिम चित्र मात्र दिवाळीनंतरच स्पष्ट होईल, असे एका विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com