जालना जिल्ह्यात चापडगावात बोंडअळीचा प्रादुर्भाव

चापडगाव येथील शेतांमध्ये बोंड अळी प्रादुर्भावाचे निरीक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांना परिस्थितीशी अवगत करून देताना कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. एस. व्ही. सोनुने, प्रा. अजय मिटकरी व उपस्थित शेतकरी.
चापडगाव येथील शेतांमध्ये बोंड अळी प्रादुर्भावाचे निरीक्षण केल्यानंतर शेतकऱ्यांना परिस्थितीशी अवगत करून देताना कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. एस. व्ही. सोनुने, प्रा. अजय मिटकरी व उपस्थित शेतकरी.

जालना : गेल्या वर्षी राज्यात थैमान घालणाऱ्या गुलाबी बोंड अळीची या वर्षी बहुधा पहिल्यांदाच जालना जिल्ह्यात चाहूल लागल्याचे निरीक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी नोंदविले आहे. घनसावंगी तालुक्‍यातील चापडगाव येथील पाहणीत मंगळवारी (ता.२४) हे निरीक्षण नोंदविले गेले.  चापडगाव येथील बालासाहेब हरबक यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या एका व्हाॅट्‌सॲप ग्रुपवर पाठविलेल्या पोस्टच्या आधारे केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने आणि पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी मंगळवारी (ता.२४) लागलीच चापडगाव गाठले. चापडगाव येथील बालासाहेब हरबक आणि दिलीप हरबक यांच्या शेताची पाहणी केली. चार जून रोजी लागवड केलेल्या या बीटी कपाशीत नवीन फुलकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. प्रदुर्भावग्रस्त फुले न उमललेल्या अवस्थेत आढळून आली. अशा प्रकारची कळी फोडून पाहिल्यास तिच्या आतमध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली. ही अळी फुलातील परागकण खाते व शेवटी फुल गळून पडते. ही बोंड अळीची पहिली पिढी जिल्ह्यात आढळून आली असून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात किमान २० झाडाचे निरीक्षण करावे. प्रत्येक झाडाचे एक फुल किंवा एक बोंड असे एका एकरातील २० फुले किंवा २० बोंडाचे निरीक्षण करावे व २ प्रादुर्भावग्रस्त फुले किंवा २ प्रादुर्भावग्रस्त बोंड आढळल्यास शिफारसीत कीटकनाशकाची फवारणी करावी. प्रदुर्भावग्रस्त फुले, पात्या, बोंडे तोडून नष्ट करावीत. फेरोमोन सापळ्यांचा वापर करून नर पतंगाचा नायनाट करावा. निंबोळी अर्काची फवारणी करावी. शेवटचा उपाय म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र खरपुडीच्या तज्ज्ञांनी केले आहे. येत्या ३० जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्राद्वारे या संदर्भात शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. एस. व्ही. सोनुने यांनी दिली. पैठण तालुक्‍यातील चांगतपुरीतही आढळला प्रादुर्भाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यांतर्गत चांगतपुरी येथील शेतातही गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. किशोर झाडे यांच्या क्षेत्र भेटीदरम्यान चांगतपूरी येथील कृष्णा तट्‌टू यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव आढळून आला. चार फूलांच्या तपासणीत दोन फूले गुलाबी बोंड अळीने प्रादूर्भावग्रस्त असल्याचे निरीक्षण यावेळी नोंदल्या गेले. कृषी विभागाचे अधिकारीही संबंधीत शेतात उपस्थित होते. यावेळी डॉ. झाडे यांनी नियंत्रणासाठीचे उपाय तातडीने अवलंबन्याची सुचना शेतकऱ्यांना केली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com