परभणीत बोंडअळीचा प्रादुर्भाव

जवळा जिवाजी, जि. परभणी ः येथील महादेव राऊत यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांवर आढळून आलेली बोंड अळी.
जवळा जिवाजी, जि. परभणी ः येथील महादेव राऊत यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांवर आढळून आलेली बोंड अळी.

परभणी : जिल्ह्यामध्ये मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड केलेल्या बी.टी. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. परभणी, सेलू, पूर्णा तालुक्यांसह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांनी लागवड केलेले कपाशीचे पीक आता पाते, फुले लागलेल्या अवस्थेत आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून या कपाशीमध्ये डोम कळ्या आढळून आल्या आहेत. मांडाखळी (ता. परभणी) येथील महादेव राऊत यांच्या शेतावर मंगळवारी (ता. २४) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी के. एम. जाधव, कृषी सहयक कृष्णा रेंगे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. राऊत यांच्या बी. टी. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावाची सुरवात झाल्याचे आढळून आले. ‘‘सद्यस्थितीत बोंड अळीचा प्रादुर्भाव हा अल्प प्रमाणात असून त्यासाठी शेतक­ऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सुरवातीस किडीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत. त्यामुळे नर-मादी मिलनात अडथळा आणता येईल. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. अळीग्रस्त कळ्या वा फुले अळीसकट नष्ट कराव्यात. निंबोळी अर्काची किंवा शिफारसीत कीटकनाशकांची फवारणी करावी,’’ असे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. अनंत बडगुजर यांनी सांगितले.सात जून रोजी अडीच एकरवर कपाशीची लागवड केली आहे. रेफ्यूजी बियाणे त्यामध्ये मिसळून देण्यात आलेले होते. गेल्या तीन, चार दिवसात पिकाचे निरीक्षण केले असता आठ-दहा फुलांमध्ये अळ्या आढळून आल्या, असे शेतकरी महादेव राऊत यांनी सांगितले.  दरम्यान, सेलू तसेच पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com