पावसामुळे कापूसपट्ट्यात आता बोंडगळीची समस्या

पावसामुळे कापूसपट्ट्यात आता बोंडगळीची समस्या
पावसामुळे कापूसपट्ट्यात आता बोंडगळीची समस्या

आर्णी, जि. यवतमाळ  ः संततधार पावसामुळे कपाशीची बोंडे गळत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अंजीनाईक येथील शेतकरी जागेश्‍वर आडे यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. संततधार पावसामुळे कापसाचा हंगाम आधीच एक महिना लांबणीवर पडला आहे. त्यातच आता कपाशीची बोंड गळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  याबाबत तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांना शेतकऱ्यांनी माहिती दिली. त्याची दखल घेत कृषी विभागाकडून तत्काळ शिवाराची पाहणी करण्यात आली. यावेळी कपाशीत सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता असल्याचे प्राथमिक पाहणीअंती समोर आले. बोंडगळीच्या समस्येचे शास्त्रोक्‍त निदान करण्यासाठी लवकरच जिल्हा स्तर आणि कृषी विद्यापीठाचे पथक भेट देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आर्णी तालुक्‍यात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाल्याने या वर्षीदेखील ते मिळतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढविले. परंतु, या वेळी संततधार पावसाचा फटका बसत कापूस उत्पादन घटले आहे. त्यासोबतच बोंड आणि पातेगळ समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. बोंडगळीमुळे होणाऱ्या नुकसानीची दखल घेत भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.   

हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे. याच अवस्थेत कर्ज रकमेतून बियाणे खरेदी करून कपाशीची लागवड केली. हंगामात पिकाचे व्यवस्थापन केले. परंतु, आता हाता तोंडाशी आलेला घास बोंडगळीमुळे हिरावला जात आहे. शासनाकडून भरपाईची मागणी आहे. - दारासिंग आडे, शेतकरी, अंजीनाईक

कपाशीच्या बोंडाची गळती होत आहे. मूलद्रव्याच्या अभावामुळे हे असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. प्राथमिक पाहणीत अनेक बाबींचा उलगडा होत नाही. त्यामुळे तांत्रिक मार्गदर्शनासाठी जिल्हास्तरीय पथकाच्या भेटीचे नियोजन केले आहे. पाहणीनंतर योग्य कारण समोर येईल. - रमेश पसलवाड, तालुका कृषी अधिकारी, आर्णी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com