कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः पोपटराव पवार
‘बोअरवेल’चा पाणी उपसा हा आपल्याला मोठ्या संकटाच्या खाईत ढकलणारा ठरेल, असा इशारा राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिला आहे.
पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी संपविले आहेच; पण आता अंदाधुंद बोअरवेल खणून जमिनीखालील पाणी संपवत आहोत. ‘बोअरवेल’चा पाणी उपसा हा आपल्याला मोठ्या संकटाच्या खाईत ढकलणारा ठरेल, असा इशारा राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे (पोकरा) आयोजित केलेल्या खरीप हंगाम नियोजन कार्यशाळेत ते बोलत होते. चर्चेत आयआयटीचे (मुंबई) प्रा. मिलिंद सोहोनी, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, ‘पोक्रा’चे संचालक विकास चंद्र रस्तोगी, कृषी विज्ञावेत्ता विजय कोळेकर, कृषी व्यवसाय विशेषज्ञ डॉ. मेघना केळकर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ‘‘होमोसेपियन काळापासून अन्नासाठी स्थलांतरित होणारा मानव संरक्षित पाण्याभोवती स्थिरावला. नदी, नाले, ओढ्याचे पाणी निसर्गाला सांभाळून वापरेपर्यंत शेती सुरक्षित होती. आधुनिक पिढीने मात्र पिकांच्या हव्यासापोटी जमिनीवर पाणी संपवले. आता जमिनी खालचे पाणीवर आणून तोही साठा संपविला जात आहे. पाणी ताळेबंद, जलसंधारण, मृद्संधारण, कमी पाण्यात समृद्ध शेती करावी लागेल. तसे न झाल्यास शेतीव्यवस्था नष्ट होईल,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
प्लॅस्टिक कागदाचा राक्षस
ग्रामसभा सक्षम असेल तरच गावात खरीप, रब्बी, उन्हाळी सिंचन नियोजन सक्षमपणे होईल, असा मुद्दा पवार यांनी मांडला. आर. आर. आबा पाटील यांच्या संकल्पनेतून राज्याला गाडगे महाराज ग्रामस्वराज्य अभियान मिळाले. त्यामुळे शेकडो गावे पुढे आली. समाज हा नेहमी चांगला असतो; पण त्याला प्रामाणिक नेतृत्वाची प्रतीक्षा असते. आदर्श गाव अभियानातून आज हिवरेबाजार, राळेगणसिद्धीपेक्षाही अनेक चांगली आदर्श गावे राज्यात उभी राहिली आहेत. गावाने आता पाण्यासह खरीप व रब्बीचे नियोजन सामूहिकपणे करायला हवे. बोअरवेल, खते, कीटकनाशकांचा मारा थांबवला हवा. आता शेततळ्यात प्लॅस्टिक कागदातून आणखी एक राक्षस उभा राहतो आहे. त्यामुळे जमिनीखाली पाण्याचे प्रवाह कोरडे होतील, असा इशारा पवार यांनी दिला.
अब्जावधी रुपये वाया ः भटकळ
शेती समृद्ध नसेल तर गाव समृद्ध होणार नाही. त्यासाठी शाश्वत पाणी महत्त्वाचे आहे. ते केवळ जलव्यवस्थापन व सामूहिक पीक व्यवस्थापनातून साध्य होईल. जमिनीखालील अक्विफरला (जलधर) छिद्रे पाडली जात आहेत. हजार फूट खोलीतून पाणी खेचल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. अब्जावधी रुपये ‘फेल बोअरवेल’मध्ये वाया गेले आहेत, असे पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नमूद केले.
चांगल्या गोष्टीची ‘ब्रेकिंग न्यूज’ का होत नाही?
चांगल्या गोष्टीची ‘ब्रेकिंग न्यूज’ का होत नाही, असा आपला सवाल असतो. पण त्यामुळे आम्ही चांगल्या गोष्टी दुय्यम ठरवल्या नाहीत. हिवरेबाजारने पाण्याचा ताळेबंद मांडून शेतीचे नियोजन केले. आमच्या शेती समृद्ध गावाचा सेंद्रिय कर्ब एक टक्क्यांच्या पुढे आहे. जग काहीही म्हणो; आम्ही पर्यावरणपूरक बाबी, सामाजिक, आर्थिक सुधारणांचा उपक्रम अखंडपणे चालू ठेवला. यातून गावच्या सरपंचापर्यंत पद्मश्रीचा सन्मान येऊन पोहोचला, असेही पोपटराव पवार यांनी आनंदाने सांगितले.
- 1 of 696
- ››