सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे महापुराने नुकसान

सांगली जिल्हा बॅंकेच्या शाखांना महापुराचा फटका
सांगली जिल्हा बॅंकेच्या शाखांना महापुराचा फटका

सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि व्यापारी यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला देखील बसला आहे. बॅंकेच्या सुमारे १२ शाखा पाण्यात बुडाल्याने सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या १२ शाखांमधील सुमारे ६५ लाखांची रोकड ओली झाली होती, त्यामुळे या नोटा ड्रायरने वाळवल्या जात असून त्या चलनातही आल्या आहेत.

कृष्णा-वारणेला आलेल्या महापुरानंतर जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यांत विदारक चित्र होते. घरे, दुकाने, पाण्याखाली गेली. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सुमारे १२ शाखा पाण्याखाली होत्या. 

जिल्हा बॅंकेच्या सांगलीतील महावीरनगर, गावभाग, ढवळी, मौजे डिग्रज शाखांमध्ये, वाळवा तालुक्‍यात तांबवे, जुनेखेड, वाळवा, रेठरेहरणाक्ष शाखांमध्ये, पलूस तालुक्‍यात दुधोंडी, बुर्ली, अंकलखोप शाखेत तसेच शिराळा तालुक्‍यात आरळा शाखेत पुराचे पाणी घुसले होते. तसेच भिलवडीतील एटीएम केंद्रही पाण्यात बुडाले होते. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बॅंकांच्या शाखातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे, इलेक्‍ट्रिक वायरिंग, कपाटे पाण्यात बुडाली. त्याचबरोबर काही शाखातील स्ट्रॉंग रूम, लॉकर्सही बुडाले. त्यामुळे आतील रोकड पुराच्या पाण्याने भिजली. 

पूर ओसरल्यानंतर जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांपैकी सांगलीतील महावीरनगर आणि आरळा शाखेत प्रत्येकी २५ लाखांची रोकड तसेच इतर शाखांतील मिळून ६५ लाख रुपये पाण्यात भिजल्याचे निदर्शनास आले. बॅंकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने भिजलेल्या नोटा उन्हात वाळवण्यास ठेवल्या. विविध ठिकाणाहून ड्रायर मागवून नोटा वाळवल्या. त्यामुळे  ६५ लाखांची रोकड नष्ट होण्यापासून वाचवली. तसेच बॅंकेच्या विविध शाखांमधून या नोटा चलनात देखील आणल्या गेल्या. 

विमा कंपनीकडून सर्वेक्षण  जिल्हा बॅंकेच्या पाण्यात बुडालेल्या १२ शाखांचा विमा उतरवला आहे. बॅंकेच्या प्राथमिक तपासणीत ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू असून  ते पूर्ण होईपर्यंत या बॅंकांचे कामकाज तात्पुरते थांबवले आहे. दोन दिवसांत या शाखांमधील कामकाज सुरू होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com