साखर उत्पादनाकडे ब्राझीलचा यंदा कल

आता जो दर मिळतोय ही एक संधी आहे. त्यामुळे जर आपणाकडे निर्यातीकरिता साखर शिल्लक असेल तर लवकरात लवकर आपण साखर निर्यातीचा निर्णय घेऊन कोणत्याही परिस्थितीत कारखान्यांनी साखर निर्यात करावी; अन्यथा भविष्यात मागणी घटण्याची शक्‍यता आहे. कोरोनाचा धोका असला तरी मागणी असलेल्या देशांकडे लक्ष देऊन कारखान्यांनी साखर निर्यात करणे गरजेचे आहे. — अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार, कोल्हापूर
साखर उत्पादनाकडे ब्राझीलचा यंदा कल
साखर उत्पादनाकडे ब्राझीलचा यंदा कल

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत ब्राझीलच्या साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीकडे अधिक लक्ष वळविल्याने भारतीय साखरेसाठी सकारात्मक स्थिती तयार होत होती. भारतीय साखरेला अनपेक्षित उठाव येत होता. परंतु यंदाचा ब्राझीलचा हंगाम तोंडावर आहे; तसेच ब्राझील यंदापासून साखरेच्या उत्पादनाकडे जादा लक्ष देण्याची शक्‍यता आहे. ब्राझीलची साखर बाजारपेठेत येईपर्यंत भारतीय कारखान्यांनी निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले होते. अशातच ‘कोरोना’ने त्यात अडथळे आणल्याने पुढील दोन-तीन महिन्यांत साखर उद्योगावरील निराशेचे ढग दाट होण्याची शक्‍यता आहे. मार्चच्या प्रारंभी जागतिक पातळीवर ‘कोरोना’ विषाणूने घातलेले थैमान; तसेच येऊ घातलेला ब्राझीलचा नवीन साखर हंगाम, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या उतरलेल्या किमती याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात साखरेचे दर ४१८ डॉलर प्रतिटन होते, ते आता ३५५ डॉलर प्रतिटनापर्यंत कमी झाले आहेत. हे साखरेचे दर मार्चअखेर अंदाजे ३०० ते ३१० डॉलरपर्यंत घसरतील, असा जागतिक पातळीवरील विशेषज्ञांचा अंदाज आहे. ज्यावेळी जागतिक बाजारात साखरेचे दर ४१८ डॉलर प्रतिटन होते त्या वेळी भारतीय निर्यातदार कंपन्यांनी २४२०० ते २४६०० रुपये प्रतिटन या दराने एक्‍स मिल साखर खरेदी केली; परंतु आता ३५५ डॉलर प्रतिटन साखरेचा दर झाल्यामुळे भारतीय निर्यात साखरेचा दर २१००० ते २१५०० प्रतिटन एक्‍स मिल इथेपर्यंत खाली आला आहे. तज्ज्ञांच्या मते जागतिक पातळीवर ‘कोरोना’ विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारतीय साखर निर्यातीमध्ये अडचणी उद्भवत आहेत; तसेच जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात खाली गेलेल्या आहेत, याचा परिणाम असा की जागतिक बाजारपेठेत साखरेच्या मागणीत घट झालेली आहे. तसेच ब्राझीलमधील सुरू होत असलेला हंगाम यामुळे बाजारभाव कमी होतील, ही निर्यातदार कंपन्यांना वाटणारी भीती यामुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय साखरेला मागणी कमी झाली आहे. या नवीन हंगामात ब्राझीलमध्ये इथेनॉलऐवजी साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाईल, त्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेचा दर ३०० डॉलर प्रतिटन इतका खाली येऊ शकतो; म्हणजे त्या वेळी निर्यात साखरेचे दर अंदाजे १९००० रुपयांच्या आसपास प्रतिटन एक्‍स मिल इतके खाली येतील. भारतीय साखरेला वाढली होती मागणी... गेल्या दोन वर्षांत ब्राझीलच्या साखर कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीकडे मोर्चा वळविला होता. या देशातील सुमारे ६४ टक्के उसाचा वापर इथेनॉलनिर्मितीसाठी केला गेला. २०१७-१८ मध्ये संपलेल्या हंगामात इथेनॉलचे उत्पादन २२६६ कोटी लिटर इतके झाले होते. या काळात गाळप झालेल्या उसापैकी केवळ ३५ टक्के उस साखरेसाठी वापरण्यात आला होता; तर ६४ टक्के ऊस इथेनॉलसाठी वापरण्यात आला होता. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गेल्या वर्षीपासून जगात साखरेची चणचण निर्माण झाली. भारताकडे मुबलक साखर असल्याने साहजिकच गेल्या सहा महिन्यापासून भारतीय साखरेला मागणी वाढली. परंतु यंदा मात्र ब्राझीलच्या साखर उद्योगाने साखरनिर्मितीला प्राधान्य द्यायचे ठरविल्याने पुढील दोन तीन महिन्यांनंतर याचा परिणाम भारतावर जाणवण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com