मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
अॅग्रोमनी
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरले
वाहतुकीतले अडथळे दूर झाल्याने ब्राझीलची साखर मोठ्या प्रमाणात जगभरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहे. परिणामी, गेल्या सप्ताहापासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ४० ते ४५ डॉलरनी घसरले आहेत.
कोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ब्राझीलमध्ये साखरेच्या उत्पादनात साठ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने त्याचा परिणाम आता साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. वाहतुकीतले अडथळे दूर झाल्याने ब्राझीलची साखर मोठ्या प्रमाणात जगभरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये दाखल होत आहे. परिणामी, गेल्या सप्ताहापासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ४० ते ४५ डॉलरनी घसरले आहेत. आठवड्यापूर्वी असणारा टनाचा दर ३९६ अमेरिकन डॉलरवरून ३५१ डॉलरवर आला आहे. दराचा घसरता आलेख भारतासाठीही धोक्याची घंटा आहे. आणखी दर खाली येण्याअगोदर उद्दिष्टांपैकी शिल्लक साखर तातडीने निर्यातीची गरज निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारात ब्राझीलच्या साखरेचा दबदबा आहे. गेल्या वर्षी ब्राझीलने इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य दिले होते; परंतु इथेनॉलला अपेक्षित दर न मिळाल्याने यंदा ब्राझीलने परत साखर उत्पादन वाढविले. ब्राझीलचा हंगाम मार्चपासून सुरू झाला आहे. दोन महिन्यांत ब्राझीलच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत साठ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी ४८ लाख टन उत्पादन पहिल्या दोन महिन्यांत होते. हेच उत्पादन आता ८० लाख टनापर्यंत पोचले. पहिल्या दोन महिन्यांत साखर उत्पादित तर झाली; परंतु वाहतूक होत नसल्याने ब्राझीलमध्ये साखरेचे साठे तसेच पडून होते. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही साखरेची हालचाल थांबली होती.
जून महिन्यापासून जगात अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने निर्यातीलाही चालना मिळाली. ब्राझीलचे अडथळे दूर झाल्याने ब्राझीलची साखर गतीने आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होत आहे. याचा नकारात्मक परिणाम लंडनसह अन्य बाजारपेठांतील साखर दरावर होत आहे. साखर जादा येत असल्याने दरातही घसरण सुरू झाली आहे. याचा फटका आता भारतालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुधारित साखर कोट्याची प्रतीक्षा
अजूनही भारतीय साखरेला अनेक देशांकडून मागणी आहे. ब्राझीलची साखर वेगात बाजारपेठांमध्ये जाण्याअगोदर भारतीय साखर संबंधित देशांकडे पोच होणे गरजेचे आहे. केंद्राने जे साखर कारखाने साखर निर्यात करणार नाही त्या कारखान्यांचा कोटा कमी करून ज्यांनी अगोदरच कोट्याइतकी साखर निर्यात केली आहे त्यांना अतिरिक्त कोटा देण्याबाबत मार्चमध्ये आदेश काढले होते. साठ लाख टन उद्दिष्टांपेक्षा अद्याप दहा ते पंधरा लाख टन साखर निर्यात झाली नाही. हे कोटे तातडीने संबंधित साखर कारखान्यांना मिळाल्यास आणखी दर घसरण्याअगोदर नव्याने कोटा मिळालेले कारखाने साखर निर्यात करू शकतील, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.
‘एमएसपी’वाढीकडे लक्ष
साखरेचा प्रस्तावित किमान विक्री दर (एमएसपी) तातडीने वाढविला तर याचा फायदा देशांतर्गत साखर विक्रीसाठी होऊ शकतो. किमान विक्री दर वाढीची अंमलबजावणी तातडीने झाल्यास स्थानिक बाजारपेठेत दर चांगला मिळेल. केंद्राने तातडीने याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी साखर कारखानदारांची आहे.
ब्राझीलच्या साखरेमुळे जागतिक बाजारात साखरेचे दर कमी झाले आहेत. गेल्या महिनाभरात भारतातील साखरही निर्यात होण्याच्या हालचाली वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी दर कमी होण्याअगोदर उद्दिष्टाइतकी साखर निर्यात करण्यासाठी केंद्र व कारखाना दोन्ही स्तरांवर वेगाने प्रयत्न होणे आवश्यक आहे.
— अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार, कोल्हापूर
- 1 of 29
- ››