गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापन

गाई पहिला माज १५ महिन्यात तर म्हशी पहिला माज १८ महिन्यात दाखवतात. मादी गाभण आहे अशी खात्री झाली की, योग्य संतुलित व पौष्टिक आहार द्यावा. गाभण जनावराची स्वतंत्र निगा करावी.
take proper care of pregnant animals
take proper care of pregnant animals

कालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६ महिने वय झाल्यावर पैदासक्षम होतात. गाई पहिला माज १५ महिन्यात तर म्हशी पहिला माज १८ महिन्यात दाखवतात. मादी गाभण आहे अशी खात्री झाली की, योग्य संतुलित व पौष्टिक आहार द्यावा. गाभण जनावराची स्वतंत्र निगा करावी. पशुप्रजननाची क्रिया म्हणजेच ऋतुचक्रामध्ये जनावर माजावर येणे. कालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६ महिने वय झाल्यावर पैदासक्षम होतात. कालवडी २५० किलो शरीरवजनाच्या तर वगारी ३०० किलो शरीरवजनाच्या झाल्या की माजावर येतात. कालवडी व वगारी प्रथम माजावर येण्याचे वय, त्यांची जात, आहाराचे प्रमाण आणि पैदासक्षम नराशी जवळीक यावर अवलंबून असते. कालवडी, गाई, वगारी आणि म्हशी मध्ये एक ऋतुचक्र हा सर्वसाधारणपणे २१±२ दिवसाचा असतो. माजाची लक्षणे

  • कालवडी सतत हंबरणे, अस्वस्थ असणे, चारा पाणी कमी खाणे.वगारीमध्ये हंबरणे सहसा नसतो.
  • शेपटी वर करणे, सतत थोडी थोडी लघवी करणे, पातळ शेण टाकणे.योनी मार्ग सुजलेला व लालसर/गुलाबी दिसणे.माजाच्या वेळी योनी मार्गातून चिकट, पारदर्शक काचेसारखा चकाकणारा स्राव गळणे.स्राव मांडीस, शेपटीखालील बाजूस चिकटलेला असणे.
  • एकदा वेत झालेल्या गाई आणि म्हशीमध्ये दूध नेहमी पेक्षा थोड कमी देणे आणि अवेळी पान्हा सोडणे ही लक्षणे दिसून येतात.
  • याकडे लक्ष द्या

  • सकाळ, सायंकाळ आणि रात्री  माजाच्या लक्षणासाठी जनावराचे निरीक्षण करावे.
  • जर जनावर सकाळी माजावर आल्यास सायंकाळी आणि सायंकाळी माजावर आल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी कृत्रिम रेतन किंवा गोरा/रेड्याकडून रेतन करावे. 
  • मादी माजावर आल्यास लगेच कृत्रिम रेतन किंवा गोरा/रेड्याकडून रेतन करू नये. कारण मादी बीजांडमधून स्त्रीबीज हे माज संपून ८ ते १२ तासानंतर स्त्री बीजनलिकेत येते.
  • शुक्राणू आणि स्त्रीबीज जीवनमान हे सर्वसाधारणपणे २४ तास असते. या करिता वरील सांगितल्याप्रमाणे कृत्रिम रेतन किंवा गोरा/रेड्याकडून रेतन करावे. अन्यथा मादी वारंवार उलटणे असे अडथळे येणार नाहीत.
  • कृत्रिम रेतन किंवा गोरा/रेड्याकडून रेतन केल्याची नोंद करावी. तन केल्यानंतर जनावरातील माजाची खात्री पुढील प्रत्येक २१ दिवसांनी करावी.  दोन ते अडीच महिन्यानंतर गर्भधारणेची खात्री करावी.
  • मादी गाभण आहे अशी खात्री झाली की, योग्य संतुलित व पौष्टिक आहार द्यावा. गाभण जनावराची स्वतंत्र निगा करावी.
  • गाभण जनावरांची काळजी

  • गाई, म्हशीमध्ये कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक पैदाशीने गाभण करवून घेतलेली तारीख पशुपालकाने नोंद करून ठेवावी.
  • दोन ते अडीच महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून मादी गाभण  असल्याची तपासून खात्री करावी.
  • गायीचा गाभणकाळ हा सरासरी २८० दिवस व म्हशीच्या गाभणकाळ हा सरासरी ३१० दिवस असतो.
  • गर्भधारणा झाल्यापासून गाईमध्ये पहिले सहा महिने तसेच म्हशीमध्ये पहिले सात महिने गर्भाशयात वासराची वाढ हळूहळू होत असते. त्यांना संतुलित व पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. कारण याच काळात गाई, म्हशी दूधही देत असतात आणि गर्भाचा विकास होत असतो.
  • गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यात गर्भाचे वजन पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत झपाट्याने वाढते (साधारणपणे दुप्पट वजन वाढते). या काळात गाई,म्हशींचे दूध झपाट्याने कमी होत जाते.
  • गाभण जनावरांना आहारातून आवश्यक प्रथिने, ऊर्जा/कर्बोदके, क्षार/खनिजे, जीवनसत्त्वे आणि स्वच्छ पाणी द्यावे.  गाभण जनावरांना आहारात आवश्यक ऊर्जा, प्रथिनांबरोबर शिफारशीत प्रमाणात क्षार मिश्रण  द्यावे.
  • सातव्या महिन्यापासून पुढे गर्भाच्या वेगाने होणाऱ्या वाढीसाठी, विशेषतः त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शिअम आणि फॉस्फरसची मोठी गरज असते. 
  • दरम्यानच्या काळात जनावरांना वाढीव पौष्टिक आहार देणे गरजेचे असते कारण शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रथिनांची गरज भासते. यांचा उपयोग मादी तिच्या दैनंदिन शारीरिक वाढीसाठी, कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी, दुभत्या काळात शरीरातून वापरलेल्या घटकांची पूर्तता करण्यासाठी व गर्भाच्या पोषणासाठी आणि इतर शारीरिक क्रियांसाठी करणार असते.
  • शरीरातील पोषक व शरीर उपयोगाच्या घटकांची पूर्तता न झाल्यास गाभण जनावरे अशक्त होतात. गर्भपात होण्याची शक्यता वाढते. वासरू कमी वजनाचे जन्माला येते. विताना त्रास होतो, वार/जार वेळेवर पडत नाही. दूध कमी देते परिणामी आपल्या दूधउत्पादन व्यवसायाच्या अर्थशास्त्रावर पडतो.
  • गाभण जनावरांची गाभणकाळात योग्य निगा आणि देखभाल राखल्यास जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीने, गाई म्हशीच्या आरोग्याच्या हिशोबाने, पुढच्या वेतात दूध उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
  • गाय आणि म्हैस साधारणपणे गर्भधारणेच्या शेवटच्या दोन महिने बाकी असतील तेव्हा आटवाव्यात. आटविल्यानंतर शेवटचे दूध काढल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने  चारही सडामध्ये कासदाहविरोधी औषधे सोडावी. यामुळे गाय विण्यापूर्वी तसेच व्यालानंतर कास निरोगी राहण्यास मदत होते. 
  • गोठ्यात गाभण जनावरांना बसण्यासाठी गवताचा गादीप्रमाणे वापर करावा, गाभण जनावरांना रोज खरारा करावा. 
  • वारंवार गर्भपात होत असलेल्या जनावरांची पशुवैद्यकांकडून तपासणी करून गर्भपात टाळण्यासाठी उपाययोजना करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गाभण जनावरांना गर्भपात झालेल्या जनावरांच्या संपर्कातही येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • प्रजनन क्षमतेविषयी काही महत्त्वपूर्ण बाबी 

  • गाई पहिला माज १५ महिन्यात तर म्हशी पहिला माज १८ महिन्यात दाखवतात.गायीमध्ये पहिले रेतन १६ ते १८ महिन्यात आणि म्हशीमध्ये २४ ते २६ व्या महिन्यात करावे.
  • साधारणतः गायीमध्ये २६ ते २८ व्या आणि म्हशीमध्ये ३२ ते ३६ व्या महिन्यात पहिली प्रसूती व्हावी. जन्मावेळी वासराचे वजन २५ ते ३० किलो इतके असावे.
  • गाई आणि म्हशीमध्ये व्यायल्यानंतर पहिल्या माजाचे लक्षण ६० ते ९० दिवसात असावेत. सर्व साधारणपणे गाईमधील दोन वेतातील अंतर किमान १२ ते १३ महिने आणि म्हशीमध्ये १४ ते १५ महिने असावे.
  • संपर्क- डॉ. एस. एस. रामटेके, ९४२२९६३५७८ (पशुचिकित्सालय संकुल,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com