रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे फायदेशीर..

Broad bed and furrow method for groundnut cultivation
Broad bed and furrow method for groundnut cultivation

भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. जमिनीस प्रथम पाणी देऊन वापसा आल्यानंतर पाभरीच्या सहाय्याने किंवा टोकण पद्धतीने लागवड करावी. उपट्या जातीसाठी दोन ओळीमध्ये ३० सेंमी व दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवावे. भुईमुगाच्या उत्पादन वाढीसाठी सुधारित जातींची निवड, जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया, रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड या महत्वाच्या बाबी आहेत. याचबरोबरीने ठिबक सिंचनाचा वापर, कमी कालावधीच्या जाती, संतुलित रासायनिक खतांच्या मात्रांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. भुईमूग उत्पादनामध्ये प्रति हेक्‍टरी रोपांची संख्या, बियाणांचे प्रमाण, उगवणक्षमता याकडेही लक्ष द्यावे.

  • लागवडीसाठी हलकी, मध्यम प्रतीची, सेंद्रिय पदार्थ व कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.  
  • १५ ते २० सेंमी खोलीपर्यंत नांगराची एक व वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात पुरेसे शेणखत समप्रमाणात पसरून वखराने मिसळून घ्यावे.
  • सुधारित जाती  

    जाती कालावधी (दिवस) हेक्‍टरी उत्पादन (क्विं)  प्रमख वैशिष्ट्ये
     टी. ए. जी -२४ ९० ते ९५ २५ ते ३० उपटी जात, तेलाचे प्रमाण ५० ते ५१ टक्के
    टी. जी.-२६ १०० ते ११० २० ते २५ उपटी जात, संपूर्ण महाराष्ट्रासाठी
    आय. सी. जी. एस.- ११ ११५ ते १३० १८ ते २० उपटी जात, तेलाचे प्रमाण ४९ टक्के
    एस. बी.- ११ ११० ते ११५ १५ ते १६ उपटी जात, तेलाचे प्रमाण ४८.२२ टक्के
    फुले उन्नती १२० ते १२५ ३० ते ३५ उन्हाळी हंगामासाठी उत्तम, टिक्का व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
    जे. एल.-५०१ ११० ते ११५ २५ ते २८ पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
    फुले भारती ११५ ते १२० ३० ते ३५ उत्तर महाराष्ट्रासाठी

    पेरणीचे नियोजन  

  • उपट्या जातीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. फुटलेले व रोगट बियाणे काढून टाकावे.
  • प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. लागवडीपूर्वी स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धन (पीएसबी) २५० ग्रॅम आणि रायझोबियम जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति दहा किलो बियाणांस प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी.
  • पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधवड्यात करावी. जमिनीस प्रथम पाणी देऊन वापसा आल्यानंतर पाभरीच्या सहाय्याने किंवा टोकण पद्धतीने लागवड करावी. उपट्या जातीच्या लागवडीसाठी दोन ओळींमध्ये ३० सेंमी व दोन रोपांमध्ये १० सेंमी अंतर ठेवावे.
  • खत व्यवस्थापन

  • हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी जमिनीत समप्रमाणात तिफणीने पेरुन द्यावे. गंधकाची गरज भागविण्यासाठी स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे किंवा ४० किलो गंधक पेरणीपूर्वी जमिनीत समप्रमाणात पेरून द्यावे.
  • लागवडीच्या वेळी १२५ किलो आणि उरलेले १२५ किलो जिप्सम आऱ्या लागण्याच्या वेळी द्यावे. ३) माती परीक्षणानुसार १० किलो झिंक सल्फेट, १० किलो फेरस सल्फेट आणि २ किलो बोरॉन ही सूक्ष्मअन्नद्रव्ये द्यावीत.
  • रुंद सरी वरंबा पद्धतीवर लागवड  

  • भुसभुशीत केलेल्या जमिनीत दीड मीटर (पाच फूट) अंतरावर हलक्‍या नांगराने किंवा इक्रिसॅट अवजाराने (टी-बार) ३० सेंमी (एक फूट) रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे १.२ मीटर (चार फूट) रुंदीचे वरंबे तयार होतात.
  • रुंद वरंब्यावर ३० सेंमी अंतरावर मार्कर किंवा तिफणच्या साह्याने काकर पाडून १० सेंमी अंतरावर टोकण पद्धतीने बी लावावे. टोकण करताना २.५ सेंमी खोलीवर बी पेरावे. या पद्धतीमध्ये १०० ते १२० किलो बियाणे लागते.
  • फायदे  

  • ठिबक सिंचनासाठी रुंद वरंबा सरी पद्धत फायदेशीर आहे.
  • सिंचनाचे भीज पाणी सरीतून देता येते. जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो.
  • तुषार सिंचनाचा वापर केल्यास पिकास समान पाणी मिळते. मुळांभोवती हवा खेळती राहते.
  • पिकाची वाढ चांगली होते. शेंगा काढणे सोपे जाते.
  • पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेत उत्पादनात सरासरी ४० ते ५० टक्के वाढ होते.
  • संपर्कः डॉ. वा. नि. नारखेडे, ९८२२९९२८६४ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com