मराठवाड्यात उपलब्ध होणार नांदेड ४४ बीटी कपाशी बियाणे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या संकरित कपाशीच्या नांदेड ४४ बीटी (बीजी २) या वाणाच्या २१ हजार १८८ बियाणे पाकिटांचा पुरवठा महाबीजकडून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यंदाच्या हंगामात करण्यात येत आहे. नांदेड ४४ बीजी २ वाणांच्या बियाणे पाकिटांचे लोकार्पण शनिवारी (ता. १५) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात करण्यात येणार आहे. या संदर्भात महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी माहिती दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला कीडरोग प्रतिकारक्षम तसेच पुनर्बहार लागत असल्यामुळे उत्पादनाच्या बाबतीत सरस असलेला कपाशीचा नांदेड ४४ हा वाण एकेकाळी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरला होता. अनेक वर्षांच्या संशोधन चाचण्या घेऊन हा वाण बीटीमध्ये परावर्तित करण्यात आला आहे. महाबीजतर्फे यंदाच्या खरीप हंगामापासून नांदेड ४४ बीटी (बीजी २) कपाशी बियाणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रथमच मर्यादित प्रमाणात बिजोत्पादन घेण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांत या वाणाची ५ हजार ३२५ पाकिटे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु बियाणांची उपलब्धता झाल्यामुळे आता महाबीजच्या परभणी विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १४ हजार २८८ बियाणे पाकिटे तसेच औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांमध्ये ६ हजार ९०० पाकिटे असे एकूण २१ हजार १८८ बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात येईल, असे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

शनिवारी होणार लोकार्पण नांदेड ४४ बीजी २ या कपाशी बियाणे पाकिटाचे लोकार्पण शनिवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे. या वेळी कुलगुरू डॅा. अशोक ढवण, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, ‘वनाकृवि’चे संशोधन संचालक डॅा. दत्तप्रसाद वासकर, महाबीजचे महाव्यवस्थापक (उत्पादन) सुरेश पुंडकर, महव्यवस्थापक (गुण नियंत्रण) डॉ. प्रफुल्ल लहाने, विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड तसेच शेतकरी उपस्थित राहणार आहेत.  

जिल्हानिहाय नांदेड ४४ बीजी २ बियाणे पाकिटांचा पुरवठा
जिल्हा  बियाणे पाकीट संख्या
परभणी ५५६०
हिंगोली १५००
नांदेड ६०२८
लातूर १०००
उस्मानाबाद २००
औरंगाबाद १९००
जालना २०००
बीड ३०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com