यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी विभाग

यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी विभाग
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी विभाग

पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात बीटी कापूस बियाण्यांचा मुबलक पुरवठा होण्याची शक्यता आहे. बियाणे कंपन्यांच्या नियोजनानुसार एकूण सव्वादोन कोटी कापूस बीटी पाकिटांचा पुरवठा होईल. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आठ लाख पाकिटे जादा असतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली.  राज्यात सरासरी ४१ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. विदर्भ, मराठवाडा व खानदेशात कोरडवाहू भागाचे मुख्य पीक बनलेल्या कपाशीमुळे कोट्यवधी रुपयांच्या बाजारपेठा तयार झाल्या आहेत. त्यामुळे बियाणे, खते, कीटकनाशके उत्पादक कंपन्या तसेच जिनिंग उद्योगाला चालना मिळाली आहे. मात्र, २०१७ च्या हंगामात आलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्यांसह सर्व उद्योगांना मोठा फटका बसला.   गेल्या हंगामाप्रमाणेच यंदादेखील कपाशीची लागवड तेजीत राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लागवडदेखील ३८ लाख हेक्टरच्या पुढे जाईल. कपाशीला सहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे मिळणारा भाव, बोंड अळीवर आलेले नियंत्रण यामुळे शेतकरी यंदा पेरा वाढवतील, असा अंदाज आहे. त्यामुळेच गेल्या हंगामाच्या तुलनेत राज्यात यंदा बीटी बियाण्यांचा पुरवठा आठ लाख पाकिटांनी वाढविण्याचा प्रयत्न आमचा आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   बीटी बियाणे उत्पादनातील सर्व प्रमुख कंपन्यांनी आपले बियाणे वितरण नियोजन आराखडे तयार केलेले आहेत. गेल्या हंगामात राज्याभरात २८ कंपन्या होत्या. गेल्या हंगामासाठी दोन कोटी २० लाख बीटी पाकिटांचे नियोजन केले गेले. यंदा किमान दोन कोटी २८ लाख पाकिटांपर्यंत पुरवठा नियोजन झाल्यामुळे कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अडचणी येणार नाहीत, असे कृषी विभागाला वाटते.  राज्याच्या गुण नियंत्रण विभागाचे संचालक विजयकुमार इंगळे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी केशव मुळे, मुख्य बियाणे निरीक्षक चंद्रकांत गोरड यांच्याकडून बियाण्यांच्या पुरवठा नियोजनाचा आढावा घेण्यात आला आहे. ‘यंदा सर्वांत जास्त बीटी बियाण्यांचा पुरवठा राशी सीडस् कंपनीकडून राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अजित, अंकूर, नुझिविडू कंपन्या देखील भरपूर प्रमाणात पुरवठा करण्याची चिन्हे आहेत,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.  गरजेपेक्षाही ८० लाख जादा पाकिटे बीटी कापूस बियाण्यांच्या एकूण पुरवठ्यापैकी प्रमुख कंपन्यांकडून दीड कोटी पाकिटांच्या आसपास पुरवठा होण्याचा अंदाज आहे. अंदाजे राशी कंपनीकडून ३२ लाख पाकिटे, अजित सीडसकडून २० लाख, अंकूरकडून २७ लाख, तर नुजिविडू २६ लाख पाकिटांचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच महिको कंपनीकडून ११ लाख पाकिटांची उपलब्धता होण्याची शक्यता आहे. ‘मुळात राज्यातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष गरज पावणेदोन कोटी पाकिटांच्या आतच असते. त्यामुळे गरजेपेक्षाही ७०-८० लाख पाकिटे जादा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या वाणांची खरेदी करावी. उत्पादनवाढीसाठी चांगले नियोजन करावे,’ असे मराठवाड्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com