बुलडाणा जिल्ह्यात घाटावर पावसाचा पुन्हा तडाखा

बुलडाणा जिल्ह्यात घाटावर पावसाचा पुन्हा तडाखा
बुलडाणा जिल्ह्यात घाटावर पावसाचा पुन्हा तडाखा

बुलडाणा  ः जिल्ह्यात घाटावरील काही तालुक्यांमध्ये रविवारी (ता. ६) जोरदार पाऊस झाला असून बुलडाणा तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीटही झाली. सोयाबीन ऐन काढणीचे दिवस सुरू झालेले असताना अशाप्रकारचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  रविवारी दुपारनंतर बुलडाणा, चिखली, मेहकर या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यात नांद्राकोळी, रुईखेड, सव, खुपगाव, अजिसपूर या परिसरात जोरात पाऊस झाला. यादरम्यान काही मिनिटे गारांसह पाऊस झाला. यामुळे सोयाबीन, कापूस, भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने यंत्रणांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यावर यावर्षी पावसाची चांगली कृपा झालेली आहे. गेल्यावर्षी दुष्काळी झळा झेलणाऱ्या या भागात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. सध्या या भागात सोयाबीन सोंगणीचे सार्वत्रिक काम सुरू आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या सुड्या रचण्याचे काम सुरू होते. तर काही ठिकाणी सोयाबीनची सोंगणी केली जात होती. गेल्या आठ-दहा दिवसांत पावसाने उसंत दिल्याने सोयाबीन काढणीचे काम वेगाने सुरू झाले होते. अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची सोयाबीन गोळा करण्यासाठी एकच पळापळ झाली. सोयाबीन ओली झाल्याने मळणीचे काम लांबेल. रविवारी झालेल्या पावसाने सोंगून ठेवलेल्या तसेच सोंगणी व्हायची असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान केले आहे. गारपीट झालेल्या भागात सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या. कपाशीची पाने, बोंड्या जमिनीवर आल्या. या भागात रब्बी मक्याची लागवड सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी मका अंकुरला असून गारींचा या पिकालाही तडाखा बसला. या भागात भाजीपाल्याची पिके मोठ्या क्षेत्रावर घेतली जातात. या पिकांनाही गारपिटीमुळे नुकसान झेलावे लागले.

पाऊस आता पुरेसा सलग पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे आता नुकसान सुरू झाले आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे दुष्काळाला सामोरे गेलेल्या या जिल्ह्यात आता सलग पावसामुळे ओल्या दुष्काळाची चिन्हे तयार होऊ लागली आहेत. सतत पाऊस होत असल्याने शेतीतील कामे रखडणे, काढणीला आलेले पीक ओले होत असल्याने नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. कापसाची वेचणीही सुरू होत आहे. हा कापूसही ओला होत आहे. रब्बी हंगाम लवकरच सुरू होत आहे. यासाठी आता पावसाने ब्रेक घेणे खूप गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com