बुलडाणा जिल्हा निघाला `सीड हब’च्या मार्गावर

सिंदखेडराजा हा विदर्भातील मराठवाडा सीमेवर असलेला तालुका. या तालुक्‍याच्या अर्थकारणाचा कणा हा शेती आहे. ७० टक्के क्षेत्र हे अवर्षणप्रवण आहे. या वर्षी तर अभूतपूर्व अशी भीषणता आहे. तरी या मातीचे एक वेगळेपण आहे. एक ऊर्जेचे क्षेत्र आहे. तसेच बीजोत्पादनामध्ये एक उभारी देणारे क्षेत्र म्हणून ओळख बनली आहे. विविध बहुराष्ट्रीय खासगी कंपन्यांमार्फत बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना कमी जागेतून हक्काचे उत्पादन देणाऱ्या बीजोत्पादन क्षेत्राला आर्थिक बळकटी प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत मागेल त्याला शेततळे व अस्तरीकरण, शेडनेट, पॉलिहाउस यासाठी पाठबळ दिले जाते. - वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा जि. बुलडाणा
बिजोत्पादन
बिजोत्पादन

बुलडाणा ः शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीचा अंगीकार केल्याने गेल्या काही वर्षांत बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात बीजोत्पादनाचे क्षेत्र विस्तारत आहे. सध्या जिल्ह्यात शेडनेट व खुल्यावर मिळून सुमारे सात ते आठ हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्रावर बिजोत्पादन होते. देशात बीजोत्पादक जिल्हा म्हणून बुलडाण्याची घौडदौड सुरु असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ ऑक्‍टोबरला जिल्ह्याला सीड हब बनविण्याच्या उद्देशाने विशेष बाब म्हणून २०० शेडनेट तत्काळ मंजूर करण्याची घोषणा केली. यामुळे पुन्हा एकदा बुलडाणा आणि बीजोत्पादन हे पैलू चर्चेत आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सातत्याने नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. अशाही परिस्थितीत बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीची दिशा मिळाली आहे. देशात काम करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रामुख्याने देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, चिखली, मेहकर या तालुक्‍यांमध्ये अधिकाधिक बीजोत्पादन करीत आहेत. यातून शेतकऱ्यांना जसा फायदा होत आहे, तसेच कुशल मजुरांची निर्मिती वाढली आहे. भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे बीजोत्पादन नेटमध्ये, खुल्यामध्ये शेतकरी करतात. याला पूरक ठरणारे व्यवसायसुद्धा दरवर्षी वाढत आहेत. सद्यःस्थितीत या जिल्ह्यात किमान सात ते आठ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बीजोत्पादन केले जाते. योग्य पाठबळ मिळाले व नियोजन करण्यात आले, तर ही क्षमता दुप्पट होऊ शकते, अशी पोषक स्थिती असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. दहा गुंठ्यांतील इन्सेक्‍ट नेट किंवा शेडनेटमधून बीजोत्पादक शेतकरी किमान ५० हजार ते ७० हजारांपेक्षा अधिक मिळकत वर्षभरात सहजपणे मिळवत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे अधिक क्षेत्र असले तरी हे शेतकरी छोट्या क्षेत्रात बीजोत्पादन करण्यावर अधिक लक्ष देत आहेत.   रोजगारनिर्मिती देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार या तालुक्‍यांतील काही गावे फक्त बीजोत्पादनाकडे लक्ष देत आहेत. एका-एका गावात शंभरपेक्षा अधिक नेट उभ्या राहलेल्या आहेत. बीजोत्पादनासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान शेतकरी कुटुंबांनी अवगत केले आहे. तरी नेटमध्ये बीजोत्पादन घेताना करावयाच्या कामांसाठी कुशल मजुरांची गरज भासते. हे मजूर गावागावात तयार झाले आहेत. वर्षभरातील काही मोजके दिवस सोडले तर बीजोत्पादनातून वर्षभर रोजगारनिर्मिती होत राहते. या मजुरांना इतर पिकांमध्ये काम करण्यासाठी मिळणारी मजुरी व या बीजोत्पादन शेतीत मिळणारी मजुरी यात मोठा फरक आहे.

प्रतिक्रिया  मी १९८४ पासून बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेत आहे. सुरवातीला खुल्यामध्ये कापसाचे बीजोत्पादन घ्यायचो. त्यानंतर भाजीपाला, मिरचीच्या बीजोत्पादनाकडे वळालो. या वर्षी काकडी, मिरची, टोमॅटो, सिमला, वांगे अशा विविध पिकांचे बीजोत्पादन घेत आहे. माझ्याकडे पूर्वी १३ एकर शेती होती. आज २३ एकर क्षेत्र झाले आहे. यात बीजोत्पादनाच्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे. चार बहिणी, तीन मुलींची लग्ने चांगल्या पद्धतीने या शेतीच्या भरवशावरच केली. या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या शेतकऱ्याला आर्थिक पाठबळाची मोठी गरज असते. मजुरांची गरज, त्यांना दररोज नगदी चुकारे करावे लागतात. या अडचणीमुळे नवीन शेतकरी उभा राहत नाही. कमीत कमी पाण्यात ही शेती करता येते. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकरी प्रत्येक थेंबाचा सुयोग्य वापर करीत बीजोत्पादन करीत आहेत. शासनाने पाण्याचा शाश्‍वत स्रोत निर्माण होईल पुढाकार घेतला पाहिजे. अनुदान नाही देता आले तरी चालेल मात्र गरजेच्या वेळी शेतकऱ्याला कर्ज कसे मिळेल, यासाठी शासनाने व्यवस्था उभी करायला हवी.  - रमेशराव राऊत, शेलगाव राऊत, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com