बुलडाणा जिल्ह्यात आठवड्याला टँकरच्या संख्येत वाढ

बुलडाणा जिल्ह्यात आठवड्याला टँकरच्या संख्येत वाढ
बुलडाणा जिल्ह्यात आठवड्याला टँकरच्या संख्येत वाढ

बुलडाणा : गेल्या वर्षी आजच्या तारखेत केवळ दोन टँकर धावणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात या वर्षी मात्र आता दर आठवड्याला टँकरची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ३६ टँकर धावत होते. आता यामध्ये आणखी आठ गावांमध्ये टँकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने संख्येत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात या वर्षी सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नव्हता. यामुळे प्रकल्प कोरडे राहले. भूजल पातळी वाढू शकली नाही. सद्यस्थितीत या जिल्ह्यातील एकही प्रकल्पात पुरेसा साठा नाही, तर अर्ध्यापेक्षा अधिक प्रकल्प कोरडे झालेले आहेत.

पाणीपातळी घटत चालल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापर्यंत ३८ गावांसाठी ३६ टँकर धावत होते. आता आणखी आठ गावांची टंचाईग्रस्त गावात भर पडली. टँकरची संख्या ४० पेक्षा अधिक झाली आहे. दर आठवड्यात टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव तालुकास्तरावरून जिल्हा पातळीवर येत आहेत. मार्च अखेरपर्यंत टँकरची संख्या ५० पेक्षा अधिक होण्याची वस्तुस्थिती आहे.   

जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. एक) आठ गावांसाठी नव्याने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. यात बुलडाणा तालुक्यातील चौथा, रुईखेड टेकाळे, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रूक, निमखेड, मोताळा तालुक्यातील वडगांव, टेंभी, वाडी न्हावी, आडविहिर, शेगांव तालुक्यात गायगांव खुर्द, तरोडा कसबा, कनारखेड येथे नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले.

पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील खडक पूर्णा प्रकल्पातून मराठवाड्यात पाणी नेऊ नये यासाठी हजारो नागरिकांनी मोर्चा काढला. एक दिवसाचा बंद पाळला होता. पाण्याच्या पळवापळवीविरुद्ध नागरिकांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. पाण्यासाठी खडकपूर्णा परिसरात विहिरींचे खोदकाम करण्याचे काम प्रशासनाने या लोकरेट्यापुढे तूर्त थांबवले आहे. असे प्रकार यावर्षी पाणीटंचाईमुळे अनेक ठिकाणी घडण्याची भीती प्रशासकीय स्तरावर व्यक्त होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com