बुलडाण्यात आठवड्यात २५ टक्के पाऊस

बुलडाण्यात आठवड्यात २५ टक्के पाऊस

बुलडाणा : जिल्ह्यात या वर्षात पावसाने जोरदार मुक्काम ठोकला आहे. मागील आठ ते दहा दिवसांत पावसाने जिल्ह्यातील सरासरीची २५ टक्के पातळी ओलांडली आहे.  

जिल्ह्याची ६६७ मिलिमीटर सरासरी असून, गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंत १७१ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या २५.७३ टक्के हा पाऊस आहे. मात्र या वेळी पावसात असमानता दिसून येत आहे. दुष्काळी झळा झेलणाऱ्या या जिल्ह्यात पावसाची सुरवात जोरदार झाली आहे. प्रामुख्याने बुलडाणा आणि संग्रामपूर तालुक्यात २५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. अतिपावसामुळे या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी शेती, घरांचे मोठे नुकसान झाले. 

जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षांत पावसाची अवकृपा राहिली. यंदा सुरवात चांगली झाली. तरीही तुलनेने देऊळगावराजा, लोणार, मलकापूर या तालुक्यांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची गरज आहे. प्रामुख्याने देऊळगावराजा तालुक्यात आजवर केवळ ८५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या भागात पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्यांची कामे रखडली आहेत. दुसरीकडे संग्रामपूर, जळगाव जामोद, बुलडाणा, चिखली, मेहकर, शेगाव, मोताळा या तालुक्यांमध्ये जमिनीत ओल अधिक असल्याने पेरण्यांना विलंब होत आहे. 

बुलडाणा, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, चिखली, मेहकर आदी तालुक्यांत जलसंधारणाची कामे तुडुंब भरली आहेत. काही ठिकाणचे बांध पुराने वाहून नेले. बुलडाण्यातील येळगाव प्रकल्प केवळ तीन दिवसांतील पावसाने ओव्हरफ्लो होत आहेत. एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळे प्रकार दिसत आहेत. पावसाने २५ टक्के सरासरी ओलांडली, तरी कुठे अतिपाऊस झाला, तर कुठे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या आठवड्यात या जिल्ह्यातील पेरण्यांची कामे जोर धरण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय पाऊस, टक्केवारी (मि.मी)

बुलडाणा  २६६.५ ३७ 
चिखली १७५  २५.७८
देऊळगावराजा ८५.८ १३.१०
सिंदखेडराजा १५४.४ २३.४०
लोणार १२५.१  १७.३३
मेहकर  १९०.८ २५.४६
खामगाव १३५.८ २१.२१
शेगाव २३३ ३७.४०
मलकापूर १०७.२ १६.८०
नांदुरा १५८.१ २३.३३ 
मोताळा १२२.६  १९.३ 
संग्रामपूर २५१.८ ३९.५५ 
जळगाव जामोद २२८ ३५.७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com