गायी-बैलांनी बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले वासराचे प्राण

जखमी वासरू
जखमी वासरू

लिंगदेव, जि. नगर : बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात वासरू जखमी झाले, मात्र जवळच चरत असलेल्या जनावरांनी रिंगण करून बिबट्यास धुडकावून लावल्याने वासराचे प्राण वाचले. ही घटना अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गुरुवारी सकाळी सात वाजेदरम्यान घडली. नामदेव कानवडे यांनी गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील डोंगरावर जनावरे चरण्यासाठी ठेवली आहेत. त्या ठिकाणी सपराचा आडोसाही केला आहे. गुरुवारी सकाळी कानवडे यांनी जवळच जनावरे चरण्यासाठी सोडली. या वेळी त्यांना एक वासरू काकुळतेने ओरडण्याचा जोरजोरात आवाज कानी पडला. त्यांनी छापरातून बाहेर धाव घेतली तेव्हा समोरची घटना पाहून त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. बिबट्याने एका वासराच्या नरडीला पकडले होते आणि त्याला खाली पडण्याचा प्रयत्न करत होता. कानवडे या शेतकऱ्याने दुरून ओरडून बिबट्यास पळवून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या वासराला सोडत नव्हता.  इतक्यात जवळच चरत असलेले दोन बैल आणि काही गायी पळत आल्या. त्यांनी बिबट्यास हुंदडण्यास सुरुवात केली, मात्र तरीही बिबट्या वासराचे जबड्यात पकडलेले नरडे सोडत नव्हता. शेवटी एका बैलाने जोरात धडक दिल्याने बिबट्या दूर पळून गेला. मात्र तेथूनही न जाता तो पुन्हा वासरावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात होता. त्यामुळे जनावरांनी अक्षरशः रिंगण करून जखमी वासराला संरक्षण दिले आणि सर्व जनावरे बिबट्याकडे पहात ठाम उभी राहिली. काही वेळात घडलेला हा थरार भयावह होता.  नामदेव कानवडे यांनी जवळच्या लोकांना बोलावून घेतले. आरडाओरडा सुरू झाल्याने बिबट्याने जवळच असलेल्या शेतात धूम ठोकली. जनावरांनी वासराचे प्राण वाचविल्याचे पाहिल्याने कानवडे यांचेही ऊर भरून आले. दोन वर्षे वयाच्या या वासराच्या गळ्याला, मानेला व पाठी-पोटाला बिबट्याच्या चाव्याने व नख्यांच्या ओरखड्याने जखमा झाल्या आहेत. उपचार करण्यासाठी हे वासरू गावातील घरच्या गोठ्यात ठेवण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com