प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी 

राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या निकालांमुळे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले. प्रस्थापितांना धक्का देत तरुणाई अनेक ठिकाणी सत्तारुढ झाली आहे.
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी Bump into the established; Musandi of youth
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी Bump into the established; Musandi of youth

पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या निकालांमुळे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत तरुणाई अनेक ठिकाणी सत्तारुढ झाली आहे. ढोबळ मानाने विचार करता महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तीस वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या आदर्श गाव हिवरेबाजारमधील नागरिकांनी पोपटराव पवार यांनाच पसंती दिली. पवार गटाच्या सातही जागा मोठ्या फरकाने निवडून आल्या. आदर्श गाव राळेगण सिद्धीतही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे समर्थक जयसिंग मापारी यांच्या हाती सत्ता आली. औरंगाबाद तालुक्‍यातील आदर्श गाव पाटोदा येथे भास्करराव पेरे-पाटील यांच्या कन्या अनुराधा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.  विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणित पॅनेलला संमिश्र यश मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गोंदिया जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींवर चार उमेदवार निवडून आणत सर्वांना सुखद धक्का दिला आहे. गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. हेवीवेट नेते प्रफुल पटेल या भागाचे नेतृत्व करतात, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने केलेला चंचू प्रवेश अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. यवतमाळ तालुक्यात भाजपची सरशी ठरली. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे मूळ गाव असलेल्या पाटणसावंगी येथे केदार पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोल तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. वर्धा जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक उमेदवारांनी यश संपादन केले. मोर्शी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींवर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने विजय मिळविला. औरंगाबादमध्ये सत्ताधाऱ्यांना संधी तर कुठे मातब्बरांना पराभवाचा धक्‍का सहन करावा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. जालना जिल्ह्यातील पाथरवाला बु. व कुरण ग्रामपंचयातवर विजय मिळवून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गड कायम राखला. भोकरदन तालुक्‍यातील दहा मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये झालेले सत्ता परिवर्तन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना धक्‍का मानले जात आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाउ बागडे यांच्या मुळ चित्तेपिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा प्रणीत सदस्य विजयी झाले.  नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी सत्ता राखली तर काही ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले आहे. नाशिक जिल्हयात छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये उलथापालथ झाली आहे. मतदारांनी स्थानिक पातळीवरील दिगग्ज नेत्यांना नाकारल्याचे चित्र आहे. सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राजकारणाला गावातच धक्का बसला आहे.  सांगलीत ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेने आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. पलूस-कडेगाव तालुक्यात कॉँग्रेसची, तर आटपाडी-खानापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता आली आहे. तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील यांना धक्का बसला असून, राष्ट्रवादीने १७ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्गमध्ये ७० ग्रामपंचायतीपैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचे तर २२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चार ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनेलची सत्ता आली आहे. रत्नागिरीत शिवसेनेला कौल मिळाला आहे. जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलने विजयी मोहोर उमटवली. चिपळूण, संगमेश्‍वरसह खेड, दापोली तालुक्यात काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला यश मिळाले; मात्र सुरवातीपासूनच दंड थोपटणाऱ्या भाजपला फारसे यश मिळवता आलेले नाही. कोल्हापुरात बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व राहिले. दुपारी तीनपर्यंत आलेल्या कलानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बालेकिल्ल्यात ही विजयासाठी झगडावे लागले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातच त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. अनेक ठिकाणी अनपेक्षितपणे सत्तांतर झाल्याने धक्कादायक निकालाची नोंद झाली. तर नवख्या उमेदवारानाही या निवडणुकीने आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली. साताऱ्यातील कऱ्हाड उत्तरमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्याची सरशी झाली आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये संमिश्र निकाल लागला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (कै.) विलासराव पाटील- उंडळाकर, तर भाजपचे अतुल भोसले या तीन नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संमिश्र यश मिळाले आहे. पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शुंभूराज देसाईच्या गटाने सरशी घेतली आहे. सातारा-जावळी मतदार संघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. कोरेगाव मतदार संघात आमदार महेश शिंदे यांच्या गटाने निकाल आघाडी घेतली आहे. फलटण मतदार संघात अनेक गावात रामराजे नाईक-निंबाळकर गटाने बहुतांशी गावात सत्ता कायम ठेवली आहे. माण मतदार संघात आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, शेखर गोरे यांच्या गटाना संमिश्र यश मिळाले आहे. वाई मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटांची सरशी झाली आहे. 

प्रतिक्रिया

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करा. गावकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचे सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या.  -अजित पवार, उपमुख्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com