मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधी

मधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध पदार्थ मिळतात. अनेक देशांमध्ये मधापासून विविध पदार्थ तयार केले जातात.
Beekeeping in the fruit orchard
Beekeeping in the fruit orchard

मधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध पदार्थ मिळतात. अनेक देशांमध्ये मधापासून विविध पदार्थ तयार केले जातात. त्याचा मानवी आरोग्याला कसा फायदा आहे, याचा विचार करून त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. आपल्यालाही यामध्ये चांगली संधी आहे. मधमाश्यांनी झाडांच्या फुलांपासून मिळविलेला मकरंदाचे मधामध्ये रूपांतर करून तो पोळ्यांमध्ये पुढील पिढीला खाद्य म्हणून साठविला जातो. पूर्वीच्या काळी मधाचा फक्त गोड पदार्थ म्हणून वापर केला जात होता. मधामध्ये मोठ्या प्रमाणात उपयुक्त अन्नघटक त्याचबरोबर अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि जैवरोधक गुणधर्म असल्यामुळे आज मधाचा वापर गोड पदार्थाबरोबरच आयुर्वेदिक औषधी घटक म्हणून होतो. मधमाश्यांनी तयार केलेल्या मधाला कोणतीही प्रक्रिया करावी लागत नाही. त्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये कोणतेही रसायन वापरावे लागत नाही. मध अनेक दिवस चांगल्या प्रकारे टिकतो. तापमान कमी झाले तर मधामध्ये साखरेसारखे स्फटिक तयार होतात. हा मधाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. तापमान ४० अंश सेल्सिअस झाले तर स्फटिकांचे रूपांतर मधात होते. मधाचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. मेण 

  • तरुण कामकरी माश्या त्यांच्या शरीरातील ग्रंथींमधून चिकट पदार्थ स्रवतात. त्यास मेण म्हणतात. या मेणाचा वापर कामकरी माश्या त्यांचे घर तयार करण्यासाठी तसेच घराची दुरुस्ती करणे, तयार झालेल्या मधाचा कप्पा बंद करण्यासाठी करतात.
  • मेणाचा वापर कॉस्मेटिक तसेच कॅण्डल, फर्निचरचे पॉलिश यासारख्या अनेक बाबींमध्ये केला जातो.
  • परागकण 

  • मध आणि परागकणांचा वापर करून मधमाश्यांच्या पिल्लांची वाढ केली जाते. विशेषतः: मधमाश्यांची संख्या वाढविण्यासाठी परागकणांची जास्त गरज असते.
  • कामकरी माश्यांना परागकण गोळा करण्यासाठी विशेष अशा पिशवीची सोय असते. मधमाश्या मकरंद घेत असताना परागीभवनाची क्रिया करते. यादरम्यान त्या फुलांमधून परागकण गोळा करतात. गोळा केलेले मकरंद आणि परागकण मधमाश्या आपल्या पोळ्यामध्ये साठवितात.
  • शेतामध्ये परागकणांचे जास्त प्रमाण असेल तर जास्तीत जास्त परागकण गोळा करता येतात. यासाठी मधपेटीच्या प्रवेशद्वाराजवळ परागकण गोळा करण्यासाठी सापळा असतो, जेणेकरून मधमाशी आत जात असताना त्या सापळ्यामध्ये परागकण पडतात. पडलेले परागकण गोळा करून त्याचा वापर मानवी आरोग्यासाठी करता येतो.
  • परागकणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्व बी, सी, डी, ई आणि के तसेच प्रो-व्हिटॅमिन ए असते. तसेच उपयुक्त अ‍ॅमिनो अ‍ॅसिडचे मुबलक प्रमाण असते.
  • परागकणांमुळे प्रतिकार क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढते.
  • परागकणांचे सेवन केल्यामुळे शारीरिक ऊर्जा वाढून कार्यक्षमता वाढते. त्याचमुळे परागकणांचे दर मधापेक्षा तीन ते चारपट जास्त आहेत.
  • बी ब्रेड 

  • परागकण आणि मधापासून बनविलेल्या पदार्थाला बी ब्रेड म्हणतात. मधमाशी परागकण घेऊन आपल्या घरामध्ये साठविते. मधाचे आवरण देऊन परागकण साठविला जातो. नवीन पिल्लांना खाऊ घालण्यासाठी परागकण आणि मधाचे मिश्रण दिले जाते. यालाच बी ब्रेड म्हणतात.
  • मधमाश्यांची पिल्ले पराग कण तसेच मध खाऊ शकत नाही. म्हणून या दोघांचे मिश्रण गरजेनुसार वापरले जाते. काही देशांमध्ये बी ब्रेड या पदार्थाचे उत्पादन घेऊन ते मानवी आहारामध्ये वापरले जाते.
  • संपर्क- डॉ. भास्कर गायकवाड, ९८२२५१९२६० ( लेखक शेतीतज्ज्ञ आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com