संगणक परिचालकांचे प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार

संगणक परिचालकांचे प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार
संगणक परिचालकांचे प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार

नाशिक : गेल्या १९ तारखेपासून राज्यातील संगणक परिचालक संपावर आहेत. आपल्या विविध मागण्या मांडण्यासाठी व विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची मालेगांव कार्यालय येथे रविवारी (ता. १) भेट घेऊन निवेदन दिले. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत संगणक परिचालकांचे प्रश्न मांडले जातील. तसेच संबंधित विभागांच्या मंत्र्यांशी बोलून आयटी महामंडळात समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन भुसे यांनी संगणक परिचालकांना दिले. 

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालक ग्रामपंचायत स्तरावर काम करीत आहेत. मात्र, अनेक मागण्या प्रलंबित असल्याने व पाठपुरावा करून सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यातील संगणक परिचालकांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर जनतेला विविध शासकीय दाखले, विविध शासकीय योजना या व्यतिरिक्त महा-आॅनलाइनची कामे, ग्रामसभा, मासिक सभा, गावविकास आराखडे यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करतो. एका बाजूला बंदमुळे संग्राम कक्षाचे कामकाज ठप्प झाले आहे. तर विधानसभेच्या तोंडावर राज्यातील संबंध संगणक परिचालकांनी बंद पुकारल्याने सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनसुद्धा प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला मानधन मिळत नाही. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात चार दिवस आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ३० नोव्हेंबर २०१८ रोजी येत्या १० दिवसांत बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ८ महिने झाल्यानंतर शासनाने निर्णय न घेतल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दादा भुसे यांनी या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने संगणक परिचालकांना दिलासा मिळाला आहे. 

या भेटीप्रसंगी नाशिक जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे उपाध्यक्ष पोपट पवार, सचिव अण्णा काळे, सरचिटणीस सोमनाथ उडकुटे, मालेगांव तालुकाध्यक्ष भूषण बागुल, कळवण तालुकाध्यक्ष देवा आहेर, येवला तालुकाध्यक्ष सोपान सुरासे, नांदगाव तालुकाध्यक्ष दीपक त्रिभुवन, सटाणा उपाध्यक्ष अभिषेक काकडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब गाढे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com