पशुस्वास्थ्य योजनेच्या नियंत्रणासाठी कॉल सेंटर 

शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी नियंत्रणासाठी कॉल सेंटर सुरू होणार
पशुस्वास्थ्य योजनेच्या नियंत्रणासाठी कॉल सेंटर 
पशुस्वास्थ्य योजनेच्या नियंत्रणासाठी कॉल सेंटर 

मुंबई : शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी नियंत्रणासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटरच्या स्थापनेसाठी इंडसइंड बँक यांची उपकंपनी असलेली भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. 

यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सह सचिव माणिक गुट्टे, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेडच्यावतीने श्रीनिवास रेड्डी वेदुमुला, हेड कोर्पोरेट सर्विसेस इंडसइंड बँक गीता थंडानी, प्रेमनाथ सिंग आदी उपस्थित होते. 

पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार म्हणाले, राज्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामध्ये तसेच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे. दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, अशा तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी, मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत राज्यातील ३४९ ग्रामीण तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात तालुक्यांमध्ये नवीन ८१ फिरती पशुचिकित्सा पथके स्थापन करण्यात येणार आहेत. फिरत्या पशुचिकित्सा पथकांसाठी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज ७३ वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच फिरत्या पशुचिकित्सापथकांच्या कामांचा सर्वकष अभ्यास करून फलनिष्पत्ती विचारात घेऊन उर्वरित तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सापथके निर्माण करण्याचा निर्णय पुढील टप्यांत घेण्यात येणार आहे. 

भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीद्वारे पशुसंवर्धन विभागाबरोबर सामंजस्य करार करून त्यांच्या सीएसआर फंडातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून या सेंटरची कामे करण्यात येणार आहेत. भारत फायनान्स इन्क्लुजन लिमिटेड ही कंपनी कॉल सेंटर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक संगणक, विशेष सॉफ्टवेअर आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरविणार असून पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत औषधी व उपकरणांनी सुसज्ज फिरते पशुचिकित्सा वाहन, वाहन चालक व तज्ञ पशुवैद्यक उपलब्ध करून देणार आहे असे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले. 

१९६२ हा टोल फ्री क्रमांक प्रस्तावित  मध्यवर्ती कॉल सेंटरद्वारे फिरते पशुचिकित्सा वाहन व सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाने यांचा समन्वय ठेवून कमीतकमी वेळात पशुपालकांस दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक प्रस्तावित करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.केदार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com