कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?

सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे थकलेले कर्ज, शेतीतील तुटपुंजे उत्पन्न, खाणारी तोंडं चार... मानसिकदृष्ट्या खचून वडिलांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली. कर्जमाफी काही मिळाली नाही. जिल्हा बॅंकेकडे कर्जमाफीसाठी विचारणा केली तर म्हणतात, ‘आत्महत्या सहा महिन्यांतील असली पाहिजे... आता निकषात बसायसाठी मी पण आत्महत्या करू का?’’ हा सवाल आहे जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा!  जिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती आहे. गेल्या दहा वर्षांत झालेल्या या आत्महत्या आहेत. या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाने प्रत्येक एक लाख रुपयांची मदतही केली आहे. मात्र, त्यातील ५० टक्‍क्‍यांहून अधिक शेतकऱ्यांची अद्याप कर्जे माफ झालेली नाहीत. येथील ॲड. वर्षा देशपांडे यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींचा ‘वीर पत्नी’ म्हणून पाठिंबादर्शक गौरव करण्यात आला. त्या वेळी या ‘वीर पत्नीं’नी कुटुंबाला रोज कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा पट मांडला. 

कोणाला दोन मुली, तर कोणाला सासरचे सांभाळत नाही. कोणाला माहेर नाही, तर कोणाला आधारच नाही. कोणाच्या मुलाचे शिक्षण अपूर्ण, कोणाच्या मुलाला अपंगत्व, तर कोणाच्या मुलांना शिक्षण घेऊनही नोकरी नाही... शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याची दुर्दैवी मालिका महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाली. अडचणींचा डोंगर आणि मार्ग सापडेना. मागचा पुढचा विचार न करता, आपल्या अर्धांगिणीबरोबर मनातील दु:ख वाटून न घेता या भूमिपुत्रांना स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग जवळ वाटला. अतिवृष्टी किंवा अवर्षण, नापीक, अस्थितर दर, कुटुंबाचा वाढता खर्च, सावकारी जाच आणि थकलेलं कर्ज या दुर्दैवी फेऱ्यातून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली खरी. त्यांच्या मागे शेतकऱ्याच्या पत्नी आणि संपूर्ण कुटुंबच रोज मरणयातना सहन करतय. सासरे आणि पाठोपाठ चार महिन्यांत पतीने आत्महत्या केली. अद्याप सोसायटी माफ झाली नाही, सहकारी बॅंकेतील कर्जही माफ झाले नाही. या कुटुंबातील सासू- सून स्वत:चे उर्वरित आयुष्य दोन लहानग्या लेकरांना घेऊन काढतेय. तुटपुंजी कोरडवाहू शेती हाच त्यांचा आधार. त्यांचे शिक्षण, डोनेशन, रोजचे खर्च त्यांनी कसे भागवायचे?

‘‘पत्नीच्या पश्‍चात काबाडकष्ट करून मी दोन लाख रुपयांच्या कर्ज फेडले. शासनाने एक लाखाची ठेवपावती दिली. ती कुठवर पुरायची? 

आजपावतर कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून स्वत:चे जीवन संपवले, म्हणून सरकारने कर्जमाफी योजना काढली. त्याच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना कर्जमाफी नाही, मग योजना कोणासाठी काढली...’’ या आणि अशा अनेक प्रश्‍नांची गुंतागुंत घेऊन कर्जमाफीपासून वंचित कुटुंबातील अनेक भगिणी जीवन कंठत आहेत.

भगिनींना समाजाच्या पाठबळाची गरज मुंबईत दारू पिऊन विषबाधेने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला शासन प्रत्येकी तीन लाख रुपये भरपाईपोटी देते अन्‌ शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक लाखाची ठेवपावती! परत कर्जमाफीसाठीचे निकषही सहज कोणाला लाभ मिळू नये म्हणून तयार केलेले! कधीही घरातून बाहेर न पडलेल्या, पतीच्या पाठीमागे संसाराचा गाडा स्व:च्या खांद्यावर घेतलेल्या या भगिनींना समाजाच्या पाठबळाची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com