गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून दुरुस्तीचे काम पथदर्शी : पालकमंत्री शिंदे

गोेदावरी कालवे दुरुस्तीच्या कामास प्रारंभ
गोेदावरी कालवे दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन असलेल्या गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून दुरुस्तीचे सुरु केलेले काम देशात पथदर्शी ठरेल. कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा मृ‍द व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या या कामाला शासनाकडूनही आवश्यक सहकार्य केले जाईल. यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे गोदावरी कालव्यांचा दुरुस्ती कामांचा प्रारंभ बुधवारी (ता.२३) पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाला. या वेळी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, तहसीलदार किशोर कदम, संजय होन, साहेबराव कदम, बाळासाहेब कदम, विश्वासराव महाले, सचिन तांबे, अनिता कदम उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, की गोदावरी कालव्यांनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे त्याची सिंचनक्षमता घटली असून, ते जीर्णावस्थेत आहेत. त्यासाठी लोकसहभाग चळवळ सुरू करण्यात आली, ही बाब कौतुकास्पद आहे. यासाठी शासनाचे आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करू. नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाकडे प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. उर्वरित खर्चासाठी जिल्हा नियोजन, जलसंधारण विभागामार्फत निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगतले.

जलयुक्त शिवार अभियानाने राज्यात पथदर्शी काम उभे केले असल्याचे सांगून पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, की लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानाने गती घेतली. या अभियानातून राज्यातील अनेक गावांना दिलासा मिळाला आहे. कोपरगाव तालुक्यालाही जलयुक्त शिवार अभियानातून भरीव निधी दिला आहे. 

आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की गोदावरी कालव्यांची लोकसहभागातून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आपण आवश्यक निधीसाठी कायम पाठपुरावा करणार असून, या कामातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कोपरगाव तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून भरीव काम झाले असून, रस्ते, पाणी व वीज या मूलभूत कामांना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी निवृत्त उपअभियंता भास्कर सुरळे यांनी प्रास्ताविक केले.  माजी सभापती सुनील देवकर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com