काँग्रेसच्या ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : काँग्रेसने मंगळवारी रात्री उशिरा ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने कराडमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

काँग्रेसने पहिल्या यादीत ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पक्षाच्या वाट्याला १३५ जागा येणार असून, उर्वरित ३० पेक्षा जास्त उमेदवारांची यादी बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चव्हाण यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. तरीही चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केले. त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख यांना उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. आता लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुणाल पाटील व राहुल बोंद्रे या दोन विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नागपूरमधील विकास ठाकरे आदींना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

मुंबईमध्ये पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगावमधून, तर जगदीश अमीन यांना अंधेरीतून, दहिसरमधून अरुण सावंत, मुलुंडमधून गोविंद सिंग, प्रवीण नाईक यांना माहिममधून, जोगेश्‍वरीतून सुनील कुमरे, राधिका गुप्ते यांना डोंबिवलीतून, कांचन कुलकर्णी यांना कल्याण पश्‍चिममधून आणि भिवंडीतून शोएब गुड्डू यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. शिवडीतून उदय फणसेकर, कांदिवली पूर्वमधून अजंता यादव यांना उमेदवारी मिळाली आहे.

याखेरीज सांगली येथून पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली आहे. पेणमधून नंदा म्हात्रे, पुण्यातून कसबा पेठेतून काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, तर शिवाजीनगर मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसने आतापर्यंत १०३ उमेदवार जाहीर केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com