लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना विधानसभेचे वेध

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान लक्षात घेऊन इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात चांगली मते मिळवली आहेत तेथून अपक्ष तसेच लहानमोठ्या पक्षांचे पराभूत उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून किंवा लहान पक्षांच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभेच्या निमित्ताने या उमेदवारांना विधानसभेसाठी कोणती रणनीती ठरवावी लागेल याचा अंदाज आला आहे. त्यादृष्टीने पुढील पाच महिने इच्छुक उमेदवार कामाला लागलेले दिसतील.

औरंगाबाद लोकसभा मतदासंघात अपक्ष म्हणून लढणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाखांहून अधिक मते घेतली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी ते कन्नडमधून विधानसभेची निवडणूक लढवतील. भंडारा-गोंदियात पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे, बुलडाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे, वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरसकर, धुळ्यातील आमदार कुणाल पाटील, अनिल गोटे, दिंडोरीचे धनराज महाले, गडचिरोलीतील काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी, रमेशकुमार गजबे हे विधानसभेसाठी दावा करण्याची शक्यता आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे दोन टर्म प्रतिनिधीत्व केलेले शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना या निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी अस्मान दाखवले. २००९ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक लढणारे शेट्टी आधी आमदार होते. २००४ मध्ये ते शिरोळमधून निवडून गेले होते. लोकसभेला पराभूत झाल्याने शेट्टी १५ वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. जळगावमधून राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला. त्यामुळे देवकर पुन्हा एकदा विधानसभेला आपले नशीब अजमावून पाहू शकतात.

माढामधून राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे, नागपूरमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, नंदूरबारमधील पराभूत के. सी. पाडवी हे विधानसभेचे उमेदवार असू शकतात.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार नव्हते. तरीही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. आता चव्हाण विधानसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी युतीच्या उमेदवाराविरोधात बंड केले होते. कोकाटे यांनी १ लाख ३४ हजार मते घेतली. त्यामुळे ते सिन्नरमधून निवडणूक लढवू शकतात. उस्मानाबादमधून राणा जगजीतसिंह पाटील, सांगलीतील ‘वंचित बहुजन’चे गोपीचंद पडळकर, विशाल पाटील, शिर्डीतील भाऊसाहेब कांबळे विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. लोकसभेतील पराभूतांची विधानसभेसाठी तयारी

  • अशोक चव्हाण - भोकर
  • राजू शेट्टी - शिरोळ
  • हर्षवर्धन जाधव - कन्नड
  • बळीराम सिरसकर - बाळापूर
  • के. सी. पाडवी - अक्कलकुवा
  • कुणाल पाटील - धुळे ग्रामीण
  • अनिल गोटे - धुळे शहर
  • माणिकराव कोकाटे- सिन्नर
  • भाऊसाहेब कांबळे - श्रीरामपूर
  • नाना पटोले - साकोली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com