पंधरा दिवसांनंतरही उमेदवार निश्चितीचा घोळ कायम

पंधरा दिवसांनंतरही उमेदवार निश्चितीचा घोळ कायम
पंधरा दिवसांनंतरही उमेदवार निश्चितीचा घोळ कायम

मुंबई ; लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित होऊन अडीच आठवडे उलटले तरी शिवसेना वगळता प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवार निश्चितीचा घोळ अद्याप कायम आहे. निवडणूक तयारीत आघाडी घेणाऱ्या भाजपमध्ये माढा आणि ईशान्य मुंबईच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. तर महाआघाडीचे सांगली, पुणे आणि रावेरचा उमेदवार गुलदस्त्यात आहेत. पाच मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अजून प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आणखी काही दिवस उमेदवारांच्या नावाची घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी २५ जागा भाजप लढवत आहे, तर शिवसेनेने २३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपने २५ पैकी २३ उमेदवार घोषित केले आहेत. परंतु, ईशान्य मुंबई आणि माढा मतदारसंघातील उमेदवाराबाबत भाजपने निर्णय घेतलेला नाही. ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमैया यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांच्या नावाची चर्चा आहे.  ईशान्य मुंबईप्रमाणे माढातील उमेदवार निश्चितीचे घोंगडे भिजत पडले आहे. माढातून उमेदवारी मिळावी म्हणून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही भाजपचा झेंडा हातात घेतला. दोन रणजितसिंहांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न भाजपसमोर आहे. याशिवाय माढ्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे चिरंजीव रोहन यांचेही नाव चर्चेत आहे. काँग्रेस महाआघाडीत जागावाटप निश्चित झाले आहे. महाआघाडीने चार जागा मित्रपक्षाला सोडल्या आहेत. उर्वरित ४४ पैकी काँग्रेस २४ तर राष्ट्रवादी २० जागा लढविणार आहे. काँग्रेसने बहुतांश उमेदवार जाहीर केले असले तरी पुणे, सांगली आणि उत्तर मुंबईच्या उमेदवाराचा पेच कायम आहे. पुण्यातून संजय काकडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी भाजपमध्ये राहण्याचे ठरविल्याने काँग्रेसला पुण्यात उमेदवाराचा शोध आहे. सांगलीची जागा खासदार राजू शेट्टी यांना सोडायची की नाही यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. उत्तर मुंबईतून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी पळ काढल्याने तेथे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरचे नाव चर्चेत होते. आज काँग्रेसने ऊर्मिलाचे नाव जाहीर केले.  राष्ट्रवादी काँग्रेसने रावेर वगळता सर्वच मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. खडसे यांचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा आहे. महाआघाडीत सहभागी असलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पालघरचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com