ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर 

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड, रानवड व नाशिक सहकारी सहकारी साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची कोंडी वाढत गेली.
cane choping
cane choping

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड, रानवड व नाशिक सहकारी सहकारी साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची कोंडी वाढत गेली. या अडचणीवर मात करीत चारा, रसवंतीसाठी उसाचा पुरवठा व्हायचा. मात्र कोरोनामुळे ही पुरवठा साखळी अडचणीत सापडल्याने आता शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. हे कारखाने काही प्रमाणात ऊस नेत असले, तरी अद्याप तोडणीअभावी ६० टक्के क्षेत्र पडून आहे. त्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. 

निफाड व नाशिक तालुक्यांतील तीन कारखाने बंद पडूनही लागवडीखालील क्षेत्र कमी न होता वाढतच राहिले. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार निफाड तालुक्यात ४७३६ हेक्टरवर आडसाली व खोडवा ऊस लागवडीच्या नोंदी आहेत. मात्र प्रत्यक्षात पूर्वहंगामी, सुरू, आडसाली व खोडवा असे उसाचे क्षेत्र ६ ते ७ हजार हेक्टर दरम्यान आहे. त्यापैकी ४० टक्के तोड पूर्ण झाली असली तरी ६० टक्के अद्याप बाकी आहे. उसामध्ये ८६०३२ व ४१९ असा लवकर पक्व होणारा आणि जादा साखर उताऱ्याच्या उसाला कारखान्यांनी पसंती दिली. मात्र २६५ वाणाचा ऊस मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. 

तोडणीसाठी पैसे अन् ओल्या पार्ट्यांची मागणी  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊसतोडणी कामगार मर्यादित आहेत. जे शेतकरी पैसे व ओल्या पार्ट्या देतील. त्यांच्या उसाची प्राधान्याने तोड होते आहे. ऊसतोड कामगार सुरुवातीला एकरी ५ हजार रुपये घ्यायचे, मात्र आता थेट तिप्पट १५ हजारांपर्यंत बोली वाढली आहे. तर काही जण ओल्या पार्ट्यांनंतर तोडणीला प्राधान्य देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.  ऊस उत्पादकांच्या अडचणी 

  • अधिक कालावधीचा ऊस झाल्याने तुरे निघून वजनात घट 
  • कमी वजनामुळे साखर उताऱ्यावर परिणाम 
  • सिंचन सुविधा उपलब्ध असून, शेत खाली नसल्याने पिके घेण्यात अडचणी 
  • प्रतिक्रिया  स्थानिक सहकारी साखर कारखाने सुरू असते, तर आज ही वेळ आली नसती. त्यातच द्राक्ष पीक पावसाने हातातून गेल्याने उत्पन्नाची भिस्त उसावर आहे. त्यामुळे बंद कारखाने तातडीने सुरू करावेत.  -व्ही. पी. शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटना  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रसवंतीसाठी जाणारा ऊस गेला नाही. त्यामुळे उपलब्ध ऊसक्षेत्र तोडणीविना शिल्लक राहिले आहे. अतिवृष्टी व अधिक कालावधीचा ऊस झाल्याने तुरे आले आहेत. आजपर्यंत एवढी अडचण नव्हती.  - रामदास शिंदे, ऊस उत्पादक, शिंगवे, ता. निफाड 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com