agriculture news in Marathi, cane crop damage due to flood in south Maharashtra, Maharashtra | Agrowon

दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयाला

राजकुमार चौगुले/अभिजित डाके
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच महापुराने उसाचे मोठे नुकसान होणार आहे. विविध कालावधीत लागवडी झालेल्या सर्वच प्रकारच्या उसाला या पुराचा फटका बसणार आहे. निम्यापेक्षा कमी प्रमाणात जिथे पाणी राहिले आहे. तिथे पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. परंतु, निम्याहून अधिक वर जर पाणी गेले असेल तर ८० ते १०० टक्क्‍यांपर्यंत उसाचे नुकसान होऊ शकते. 
- डॉ. अशोक पिसाळ,  कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर 

कोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा नद्यांना आलेल्या महापुराने दक्षिण महाराष्ट्राचे उसाचे वैभव लयाला गेले आहे. पंधरा दिवसांपूर्वी हिरवाईने भरून डौलात उभ्या असणाऱ्या उसाच्या फडांची अवस्था आज न बघविणारी आहे. ऊस उत्पादक म्हणून ऐटीत मिरविणाऱ्या ऊस उत्पादकांचा कणाच नुकत्याच आलेल्या प्रलयकारी महापुराने मोडला. 

दोन्ही जिल्ह्यांचे मिळून सुमारे दीड लाखाहून अधिक हेक्‍टर क्षेत्रातील उसाला महापुराचा दणका बसला. कोट्यवधी रुपयांचे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे. २००५ नंतर उसाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ. बहुतांशी ऊस पूर्णपणे व अधिक काळ पाण्याखाली गेल्याने उसाचे शंभर टक्के नुकसान होणार आहे. अद्याप बरीचशी शेती पाण्याखाली दिसते. जसे पाणी उतरलेल तशी उसाची अवस्था पाहिल्यास यंदा ऊस उत्पादक पूर्णपणे कोलमडणार हे चित्र आताच स्पष्ट होत आहे. याचा गंभीर उसावर आधारित गळीत हंगाम आणि अर्थकारणावर होणार आहे.

महापुराचे पाणी जसे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पसरू लागले तशी दोन्ही जिल्ह्यांतील ऊस शेती झटकन पाण्यात गेली. कृष्णा, वारणा, पंचंगगा, दुधगंगा आदी महत्त्वाच्या नद्यांबरोबर इतर नद्यांनी दोन्ही जिल्ह्यांतील ऊस शेती गिळंकृत करण्यास सुरवात केली. एक-दोन फूट पाणी शेतात गेले तरी काही फरक पडणार नाही अशी चर्चा असतानाच दोन दिवसांत उसावर कधी पाच ते दहा फूट पाणी आले हे उत्पादकालाही कळले नाही. ज्या वेळी निम्याहून अधिक ऊस बुडला त्याचवेळी नुकसान निश्‍चित झाले. 

पोंग्यात (सुरळीत) पाणी, माती गेल्याने उसाची वाढ थांबून ऊस कुजण्याची प्रक्रीया सुरू झाली. पूर येऊन आठवड्याचा कालावधी उलटून गेला आहे. अद्यापही बहुतांशी उसातील पाणी ओसरले नाही. गावे पुराच्या वेढ्यातून रिकामी होत असली तरी ऊस शेती अद्यापही तशीच पाण्यात आहे. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली.  

सुरु, पूर्व हंगामी लागवड अधिक प्रभावित
महापुरामुळे सर्वाधिक फटका हा सुरु व पूर्व हंगामी लागवडींना बसला आहे. या हंगामात लागवड केलेला ऊस पन्नास टक्क्‍यांहून अधिक प्रमाणात बुडाला आहे. गेल्या वर्षीच्या आडसाली लागवडीचा ऊस सध्या पंधरा ते अठरा कांड्यावर आहे. यामुळे शेंड्यापर्यंत पाणी न गेल्यास आडसालीचे नुकसान काहीसे कमी होऊ शकते. परंतु, सुरु व पूर्व हंगामी ऊस मात्र धोक्‍यात आहे. साखर कारखान्याचा हंगाम या दोन हंगामावरच सुरू होत असल्याने याचा मोठा फटका यंदाच्या हंगामालाही बसणार आहे. यंदा लागवड केलेल्या आडसाली उसाचे मात्र शंभर टक्के नुकसान होणार आहे.  

तातडीने पुनर्लागवड अशक्‍य
अजूनही ऊस शेतीत पाणी आहे. पाणी ओसरून वाफसा स्थिती येण्यास दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागणार आहे. पुढील एक महिन्यातही पुन्हा पाऊस होऊ शकतो. यामुळे दोन महिन्यांपर्यंत वाफसा स्थिती येणे अशक्‍य आहे. कुजलेला ऊस बाजूला काढणे, शेत स्वच्छ करणे, बियाणांची उपलब्धता करणे व पुन्हा लागवड करणे या सगळ्या बाबी खर्चिक आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा नसल्याने शेतकरी लवकर पुन्हा ऊस लवकर लावण्याचे धाडस करणार नाहीत अशीच शक्‍यता सध्या आहे. शेतकऱ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याने आता मातब्बर शेतकरीही धास्तावले आहेत. 

ऊस शेतीला फटका बसलेले प्रमुख तालुके
कोल्हापूर - हातकणंगले, शिरोळ, करवीर, गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, गगनबावडा
सांगली - मिरज, वाळवा, पलूस, शिराळा 

असे आहे क्षेत्र
कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ५५ हजार तर सांगली जिल्ह्यात ९५ हजार हेक्‍टर क्षेत्र उसाचे आहे. तोडणी हंगामाध्ये साधारणत: ६० टक्के लावण तर ४० टक्के खोडवा असे क्षेत्र असते. साठ टक्के क्षेत्रामधील तीस टक्के क्षेत्र सुरू हंगामाचे (जानेवारी/फेब्रुवारी लागवड), वीस टक्के क्षेत्र पूर्व हंगामाचे (ऑक्‍टोबर/नोव्हेंबर लागवड) तर दहा टक्के क्षेत्र आडसाली लागवडीचे (जून/जुलै लागवड) आहे. 

अशा पद्धतीने नुकसान शक्‍य

  • उसाच्या शेंड्यात तसेच पानावर गाळमिश्रित ओल्या चिखलाचा थर बसल्याने शेंडा कुजून पाने वाळू लागतात. 
  • शेंड्याची वाढ खुंटते; ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो.
  • पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळ्या फुटतात.
  • उसाला पांगशा फुटू लागतात
  • पांगशा फुटलेल्या उसाला दशी (पोकळी) होण्याचे प्रमाण वाढते. 
  • पुराच्या पाण्यात आठ ते दहा दिवसांच्या कालावधीसाठी पूर्ण बुडालेल्या ऊस पिकाचे नुकसान ८० ते १०० टक्क्‍यांपर्यंत होऊ शकते. 

खरिप पिकांचे नुकसान (अंदाजे)

तालुका   गावे  क्षेत्र (हे.)
करवीर    ५६  १४६००
कागल   ३५  ८०५०
राधानगरी    २१  ७२८१
गगनबावडा २     २८२५
शिरोळ   ४२  ३०७७५
हातकणंगले  २३  १४०९३
पन्हाळा    ४४  १०८८१
शाहूवाडी २४  ५२४०
गडहिंग्लज    १५  ३९४४
आजरा   २४ २१३०

 

प्रतिक्रिया
आम्ही आडसाली लागवड केली होती. इतके पाणी येईल असे वाटले नव्हते. परंतु, अचानक पाण्याची पातळी वाढली आणि आमची पाच एकरांहून अधिक ऊस शेती पाण्याली गेली आहे. आता नुकसान अटळ आहे. या नुकसानीतून कोणताही दिलासा मिळण्याची शक्‍यता कमी आहे. या पुराच्या पाण्याने आम्ही हबकून गेलो आहोत.
- प्रसाद सभासद, भडगाव, जि. कोल्हापूर
 


इतर अॅग्रो विशेष
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...