देशात ऊस गाळप हंगामास प्रारंभ

गाळप हंगाम
गाळप हंगाम

कोल्हापूर: देशातील नव्या गाळप हंगामास सुरवात झाली आहे. आजअखेर २८ कारखान्यांतून १४.५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.६७ टक्के उताऱ्याने १.२५ लाख टन नव्या साखरेचे उत्पादन झाले आहे.  यंदाच्या गाळप हंगामात उत्तर प्रदेश व कर्नाटक राज्यांनी आघाडी घेतली आहे. कर्नाटक राज्यातील ९ कारखान्यांनी ६.६७ लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यातून सरासरी ९ टक्के उताऱ्याने ६० हजार टन नवे साखर उत्पादन केले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील १३ कारखान्यांतून १.८८ लाख टन ऊस गाळप झाले असून, त्यातून सरासरी ८ टक्के उताऱ्याने १५ हजार टन साखर उत्पादन झाले. दक्षिणेतील तमिळनाडू राज्यातील ६ कारखान्यांत ५.८८ लाख टन ऊस गाळप झाले असून, सरासरी ८.५० टक्के उताऱ्याने ५० हजार टन साखर उत्पादन तयार झाले. वास्तविक १ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झालेल्या नवीन साखर वर्षातील ऊस गाळपाची सुरवात महाराष्ट्रातून होणे अपेक्षित होते. मात्र, परतीच्या पावसाने प्रमुख ऊस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जो तडाखा दिला आहे, त्यामुळे शेतातील ओलावा संपेपर्यंत ऊसतोड होऊ शकत नसल्याने महाराष्ट्राचा गाळप हंगाम नोव्हेंबरच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यापासून सुरू होण्याची चिन्हे आहेत. गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांतील गाळप हंगामदेखील नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण जोमाने सुरू होईल, असा सध्याचा कयास आहे.  ‘‘एकूण उत्पादनाखालील क्षेत्रामध्ये झालेली घट व त्यासोबत ऊस उत्पादनामध्ये होणारी घट लक्षात घेता हंगामअखेर देशातील नवे साखर उत्पादन २६० ते २६५ लाख टन इतपत मर्यादित होईल, जे गतवर्षीच्या विक्रमी ३३१ लाख टन साखर उत्पादनापेक्षा सुमारे ७० लाख टनांनी कमी असण्याचा अंदाज आहे,’’ असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. दर संतुलित राहण्याची शक्यता ‘‘गेल्या दोन वर्षांच्या विक्रमी साखर उत्पादनानंतर यंदाच्या वर्षीचे अपेक्षित असणारे साखर उत्पादन, इथेनॉल निर्मितीच्या वाढीव क्षमतेमुळे तिकडे होणारा साखर वापर, तसेच विक्रमी ६० लाख टन होणारी साखर निर्यात यांच्या परिणामस्वरूप देशातील कारखानास्तरावरील साखर विक्रीच्या दरात संतुलन राहील, जेणेकरून साखर कारखान्यांच्या स्तरावरील आर्थिक परिस्थिती सुधारेल,’’ असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com