agriculture news in Marathi, cane producer had loss of two thousand crore rupees, Maharashtra | Agrowon

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दोन हजार कोटींचा फटका

राजकुमार चौगुले
रविवार, 18 ऑगस्ट 2019

या पुरामुळे शेतकरी व कारखानदारांचे आर्थिक गणित बिघडणार, हे निश्चित आहे. सध्यातरी आम्ही सर्वेक्षण करून कारखान्यास गाळपासाठी किती ऊस येईल, याचा अंदाज घेत आहोत. महापुराने यंदा कारखान्याची रिकव्हरीही मोठ्या प्रमाणात घटणार आहे. याचा फटका कारखानदारीला बसणार, हे नक्कीच आहे. आता यापुढील काळात किती ऊस येईल व रिकव्हरी किती लागेल, यावरच भविष्यात कारखाने किती वेळ चालतील, हे ठरणार आहे.

- गणपतराव पाटील, अध्यक्ष, श्रीदत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर 

कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या नजरा वळतात त्या कोल्हापूर, सांगलीकडे. देशात सर्वाधिक उतारा घेऊन उच्चांकी साखरनिर्मिती करण्यात दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्यांचा हात अद्याप कोणीही धरू शकले नाही. पण, गेल्या आठ दिवसांत महापूर आला अन् ओसरला. पण, त्याने  शेतकरी आणि कारखान्यांच्या तोंडचा घासच पळवून नेला. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सरासरी २१० लाख टन उसाचे गाळप होते. परंतु यंदा पुरामुळे ३५ टक्के  (७३.५० लाख टन) उसाचे नुकसान झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल दोन हजार कोटींचा फटका बसला. यामुळे या पट्ट्यातील अर्थचक्र महापुराच्या गाळात रुतून बसले. 

अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या ऊस हंगामाचे नियोजन कारखाने करीत असतानाच आठ दिवसांत आलेल्या महापुराने लाखो हेक्‍टरवरील उसाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदारीलाही बसला आहे. सध्याची नुकसानीची परिस्थिती पाहता कारखाने नियोजनाच्या ६० टक्के दिवस तरी चालतील की नाही, याची शंका आताच येऊ लागली आहे.

अनेक मातब्बर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसच पाण्याखाली असल्याने या कारखान्यांच्या तोंडचे पाणी पुराच्या पाण्याने पळविले आहे. अगदी हक्काचा ऊस पाण्याखाली जाऊन खराब होण्याची शक्‍यता असल्याने आता ऊस मिळवायचा कोठून, हा प्रश्‍न कारखान्यांपुढे निर्माण झाला. अगोदरच अडचणीत असलेल्या कारखान्यांपुढे यंदाचे उसाचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्‍न उभा ठाकला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २५ कारखान्याकडून १३० लाख, तर सांगली जिल्ह्यातील तेरा कारखान्यांकडून ८० लाख मेट्रिक टनापर्यंत उसाचे गाळप प्रत्येक वर्षी होते. बहुतांश गाळप हे कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा कारखान्याच्या काठावरील गावांतूनच होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल तालुके हे तर साखर कारखानदारीचे आगार म्हणूनच ओळखले जातात. हे कारखाने या नद्यांच्या काठावरच्या उसावरच अवलंबून आहेत. या नद्यांनी दोन्ही जिल्ह्यांतील ऊसशेतीला समृद्ध केले. 

बारमाही नद्यांच्या जवावर लाखो उस उत्पादकांनी एकरी शंभर टनापर्यंतची झेप सहजपणे मारली. यात कारखान्यांचाही सहभाग आहे. पाणी कमी पडत असतानादेखील ठिबकची साथ घेऊन जादा उत्पन्नाची घोडदौड सुरू असतानाच यंदा आलेल्या या पुराने उत्पादकांचा घात केला तसा कारखानदारांच्याही काळजाचा ठोका चुकविला. पुढच्या हंगामासाठी कर्ज व अन्य मार्गाने आर्थिक जुळणी सुरू असतानाच महत्त्वाच्या असणाऱ्या उसाच्या उपलब्धतेवरच पुराने घाला घातल्याने आता कारखान्यांची पूरती कोंडी झाल्याचे चित्र आहे. 

सध्या तरी दोन्ही जिल्ह्यांतील कारखाने उत्पादकांना चारा उपलब्ध करून देण्याच्या गडबडीत आहेत. तर, काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रावर पूरग्रस्तांच्या छावण्या आहेत. यामुळे कारखान्यांचे पदधिकारी सध्या तरी याच गडबडीत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे साठ ते सत्तर टक्के उसात पुराच्या पाण्याने साम्राज्य केले. बारा कांड्याच्या वरील उसाचे नुकसान काहीसे कमी असले, तरी दोन महिन्यांत तयार होऊन कारखान्याला येण्याची शक्‍यता असलेल्या उसाचे नुकसान ऐंशी टक्क्‍यांपर्यंत झाले आहे. यातच पुढील हंगामासाठी ज्या लागवडी झाल्या; त्याचेही नुकसान होणार असल्याने यंदाबरोबर पुढील हंगामाचेही काय करायचे, याच चिंतेत कारखानदार आहेत. 

ऑगस्टच्या सुरवातीच्या टप्प्यात काही दिवस पर्जन्यमान चांगले असल्याने कारखानदारांत समाधान होते. यंदा उसाची वाढ चांगली होऊन त्याचा फायदा गाळपाला होईल, अशी शक्‍यता होती. परंतु, अतिवृष्टीने सगळ्या आशा मावळल्या. गेल्या दोन वर्षांत अनेक कारखान्यांनी एकमेकांच्या स्पर्धेतून दहा ते पंधरा टक्क्‍यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. क्षमतेइतका ऊसगाळप करण्यासाठी कारखान्यांत स्पर्धा आहे. ही स्पर्धा तीव्र होत असतानाच आता जुन्या क्षमतेएवढाही ऊस गाळपास येईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाल्याने आता क्षमतेइतक्‍या कमी गाळपावरच यंदा कारखाने चालतील, असे चित्र सध्याचे आहे.

चारा देण्यासाठी कारखान्यांचा पुढाकार
बहुतांश शेती पाण्याखाली असल्याने आता चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. सभासदांकरिता कारखान्यांनी चारा द्यावा, अशी मागणी होत असल्याने काही कारखान्यांनी शेतकऱ्याचा ऊस मोळीवर विकत घेऊन तो इतरांना देऊन कार्यक्षेत्रातील चाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थात, हे काही दिवसांकरिताच शक्‍य होणार आहे. सध्या अनेक कारखानदार आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच निभावत आहेत.

आर्थिक गणित कसे बसवायचे
कारखान्यांच्या गाळपाच्या ठोकताळ्यावर कारखाने आपली आर्थिक गणिते मांडत असतात. कर्ज, अर्थसाह्यासाठी किती गाळप होईल; त्यातून किती साखर उत्पादन होईल, याचा प्रत्येक वर्षी एक कच्चा आराखडा ठरलेला असतो. यानुसार आर्थिक उलाढाली कारखाने करीत असतात. हे काम सुरू असताना आता नेमका कारखान्याला ऊस किती येईल, याबाबत कारखाने साशंक आहेत. ऊस आला तरी आता त्याचे वजन घटण्याचीही शक्‍यता आहे. सातत्याने पुराने पाणी राहिल्याने उसाची वाढ खुंटण्याची शक्‍यता आहे. यामुळे वजनात घट येऊन याचा परिणाम गाळपावरही होऊ शकतो.

साखर कारखान्यांपुढील ठळक आव्हाने

  • गाळपाच्या नियोजनासाठी पुन्हा सर्वेक्षण करावे लागणार
  • येत्या १५ दिवसांत ऊस उपलब्धता पाहून तोडणी नियोजनात बदल
  • वजन, साखर उताऱ्यात घटीमुळे कारखान्याचे नुकसान 
  • खराब झालेला ऊसही गाळपास आणावा लागणार, परिणामी प्रक्रिया खर्चात वाढ
  • बदलत्या परिस्थितीनुसार कर्ज व अन्य अर्थसाह्य मिळविण्याचे किचकट काम
  • नव्या आडसाली लावणी बुडल्याने पुढील हंगामात ऊस मिळविण्यासाठी पुन्हा झगडावे लागण्याची शक्यता
  • नव्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना मदत करणे, प्रोत्साहित करण्याचे आव्हान

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...