ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच लागेल : डॉ. हापसे

Dr. hapse
Dr. hapse

पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन करण्यासाठी आम्ही दोन दशकांपूर्वी प्रचाराला लागलो होतो. त्यात शेतकरी यशस्वीही झालेत. पाण्याची गंभीर स्थिती बघता भविष्यात उसाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे एकरी उत्पादकता अडीचशे टनापर्यंत नेण्याची तयारी आतापासूनच करावी लागेल; अन्यथा साखर उद्योगाचे भवितव्य अंधारात आहे, असा इशारा माजी कुलगुरू व प्रख्यात ऊस शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांनी दिला. ‘‘ऊस पिकाची उत्पादकता सुधारणा व दर्जेदार किफायतशीर लागवड’’ या विषयावरील कार्यशाळेत डॉ. हापसे बोलत होते. संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ पाटील, विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, शास्त्रज्ञ डॉ. विनायक बावस्कर, उत्तर प्रदेशातील शास्त्रज्ञ धर्मेंद्र सिंग, बिहारमधील ऊस शास्त्रज्ञ वसंतकुमार बचपन, युरोपात कृषी शास्त्रज्ञ आशिष लेले व्यासपीठावर होते.

कष्टाला परतावा ३० पैसे मिळतो डॉ. हापसे म्हणाले, ‘‘ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याला खर्चाच्या तुलनेत नफा मिळत नाही. शेतकरी एक रुपया खर्च करतात आणि कष्टाला परतावा फक्त ३० पैसे घेतात. त्यांना किमान सहा रुपये मिळायला हवेत. त्यासाठी सिंचन, खत आणि मशागतीची पद्धत बदलावी लागेल. राज्याला कृषी सुवर्णकाळ दाखविणारा ऊस आणि साखर उद्योगाची आता झपाट्याने पीछेहाट होते आहे. याउलट उत्तर प्रदेश पुढे जात आहे. त्यामुळे कारखान्यांची भूमिका मोलाची बनली आहे.’’ ‘‘जगभर डॉ. हापसे यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेत असताना दुर्दैवाने महाराष्ट्रात त्यांचा उपयोग करून घेतला जात नाही,’’ अशी खंत श्री. कोल्हे यांनी व्यक्त केली.

१०० एकरचा ऊस आठ एकरवर पिकेल ऊस उद्योगाने प्रयोगशील व्हावे. भविष्यातील शेतीचा वेध घ्यावा. युरोपात मी बाजरीचे पीक नेले आणि त्याचे क्षेत्र हंगेरीत आता दोन हजार एकर झाले आहे. भविष्यात ऊस साडेतीन फुटांचे राहील. तो मांडी इतका जाडीचा असेल. १०० एकरचा ऊस आठ एकरवर येईल. आपण नवे तंत्रज्ञान स्वीकारले नाही, तर आपण नष्ट होऊ, असा इशारा कृषी शास्त्रज्ञ आशिष लेले यांनी दिला. डीएसटीएचे अध्यक्ष श्रीपाद गंगावती म्हणाले, ‘‘डॉ. ज्ञानदेव हापसे हे कृषी वैज्ञानिक नसून कृषी शास्त्रज्ञांचे गुरू आहे. त्यांची तळमळ आणि कष्ट राज्याच्या ऊस शेतीला दिशादर्शक ठरले आहेत. मात्र, त्यांच्या ज्ञानाचा लाभ साखर उद्योगाने घेतला पाहिजे.’’ ‘‘ऊस पीक पाण्यामुळे बदनाम झाले; पण त्याला ठिबक तंत्र पर्याय आहे. ठिबकचा प्रसार आणि उच्च तंत्रज्ञानाच्या जाती असलेले बियाणे बदल केल्यास या उद्योगाचा ऱ्हास थांबेल,’’ असे श्री. खताळ यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात प्रत्येक गावात ऊस ‘‘ज्वारीसारखा बारीक ऊस आधी उत्तर प्रदेशात होता. उतारा फक्त ७ टक्के होता. आता प्रत्येक गावात ऊस दिसतोय. १२ टक्के उतारा झाला आहे. डॉ. हापसे यांनी आम्हाला ऊस पिकाशी बोलणं शिकविल्याने हा चमत्कार घडला," असे शास्त्रज्ञ धर्मेंद्र सिंग यांनी सांगितले. ‘‘मुळात उत्तर प्रदेशात सीओ २३८ हे नवे ऊस वाण २००३ मध्ये आले होते. पण डॉ. हापसे तंत्रज्ञान आल्यानंतर आमचा भाग देशात आघाडीवर आला,’’ असे जागतिक दर्जाचे साखर उद्योग सल्लागार  डॉ. वसंतकुमार बचपन यांनी सांगितले. उसाला भविष्यात पाणी मिळणार नाही देशाची लोकसंख्या पुढील तीन दशकाचा विचार करता ३७५ लाख टनांपर्यंत जाईल. तथापि, ऊस लागवड आणि क्षेत्र कमी होत जाईल. उसाला पाणी दिले जाणार नाही. त्यामुळे ऊस उत्पादकता वाढविणे हाच एकमेव मार्ग राहील. उत्पादन २५० टनांपर्यंत न्यावे लागेल. अर्थात, डॉ. हापसे यांच्यासारखे अभ्यासू शास्त्रज्ञ आपल्याकडे असल्याने ही उत्पादन वाढ सहज शक्य आहे, असे डीएसटीएचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद गंगावती यांनी स्पष्ट केले.   अडीचशे टनासाठी काय करावे लागेल?

  • पाचट काढून आच्छादन करा व जागेवर कुजवा.
  • पीक संरक्षण अचूक हवे; अन्नद्रव्य पुरवठा उत्तम हवा.
  •  ऊस लोळू नये यासाठी रान व ऊस बांधणी. पीएसएपीचा वापर अत्यावश्यक.
  • कारखान्यांनी विभागवार प्रात्यक्षिके द्यावीत.
  • मजूर मिळत नाहीत. मात्र मजुरांना न हटविता त्यांची कार्यक्षमता वाढवावा. तसेच छोटी यंत्रे वापरा.
  • सेंद्रिय कर्ब व उपयुक्त जिवाणू वाढवा, १ टक्क्यापेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असल्यास अन्नद्रव्ये व सिंचन व्यवस्थापन यशस्वी होते. 
  • सहकारी व खासगी कारखाने आणि संस्थांनी एकत्र येऊन विस्तार कार्यक्रम घ्यावेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com