नाशिक : वसाकाच्या ऊस उत्पादकांचे थकलेले पैसे मिळेना

ऊस उत्पादकांचे थकलेले पैसे मिळेना
ऊस उत्पादकांचे थकलेले पैसे मिळेना

नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना धाराशिव कारखान्याकडे भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला आहे. अनेक ऊस उत्पादकांनी सन २०१८-१९ मध्ये धाराशिव संचलित वसाका कारखान्यास स्वतः ऊसतोडणी करून गाळपासाठी ऊसपुरवठा केला. या बदल्यात तोडणी व वाहतुकीचे थकीत पेमेंट अद्यापपर्यंत भाडेकरू संस्थेने अदा न केल्याने संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांसह ऊस वाहतूकदार व ऊसतोडणी कामगारांनी गुरुवारी (ता. ५) कारखाना कार्यस्थळावर सकाळपासून ठिय्या मांडल्याने धाराशिव कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी मनोहर जावळे यांना घेराव घालत जाब विचारला.

या घटनेची माहिती देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांना मिळाल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार देवळा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निकम यांनी या प्रकरणी येत्या १० तारखे पर्यंत पेमेंट अदा केले जाईल अन्यथा व्यवस्थापकीय मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितल्याने संतप्त शेतकरी शांत झाले. वसाका कारखान्यास गाळपासाठी स्वतः ऊसतोडणी करून स्वःखर्चाने पुरवठा केला. सुमारे अठरा महिन्यांचा कालावधी उलटूनही धाराशिव कारखान्यांच्या व्यवस्थापन मंडळाने बिल अदा केले नाही. 

या प्रकरणी देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ व पोलिस निरीक्षक खंडेराव रदवे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संजय सोनवणे, संदीप जगताप, अमरिओदिन काझी, किशोर चौधरी, सुखदेव पाटील, अरुण पाटील, सोपान माळी, नंदूलाल महाजन, राजेंद्र वाघ, दत्तू बिरारी, प्रदीप पाटील, विठ्ठल परदेशी, रमेश माळी, इब्राहिम शेख, भरत शिंदे आदीसह चाळीसगाव, शहादा, नवापूर, विसरवाडी, तळोदा येथील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, बागलाण तालुका अध्यक्ष सुभाष आहिरे, प्रहार शेतकरी संघटनेचे विनोद आहेर यांनी मध्यस्थी करीत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. या वेळी उपस्थिताच्या वतीने प्रशासकीय अधिकारी जावळे यांना निवेदन देण्यात आले.

अभिजित पाटलांच्या खोट्या घोषणेला बळी धाराशिव प्रशासनाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कारखाना हंगाम सुरू होतेवेळी परिसरातील इतर कारखान्याच्या तुलनेत एक रुपयाने अधिक भाव देईल, अशी घोषणा केली होती, असे फसवणूक झालेले शेतकरी सांगतात. त्यामुळे या घोषणेला अनेक ऊस उत्पादक बळी पडले. त्यांनी स्वतः तोडणीसह कारखान्याला ऊस पुरवला. या पोटी कारखाना प्रशासनाने धनादेश दिले. मात्र ते न वटल्याने फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. मात्र वेळोवेळी मागणी करूनही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या घोषणेला बळी पडल्याचे शेतकरी सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com