कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माण

कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माण
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माण

शेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण  करण्यासाठी सह्याद्री फार्मर्स कंपनी आणि टाटा स्ट्राईव्ह यांनी नुकतीच ''स्किल डेव्हलपमेंट अकादमी'' स्थापन केली आहे. सह्याद्री फार्मच्या मोहाडीस्थित (ता. दिंडोरी) कॅम्पसमध्ये ग्रामीण तरुण, ॲग्रिकल्चर प्रोफेशनल्स आणि शेतकरी यांच्यासाठी ही अकादमी काम करत आहे. खरे तर गावाकडचे दहावी - बारावी उत्तीर्ण वा कला शाखेचे पदवीधर हे शेतीच्या दृष्टीने अप्रशिक्षितच म्हणावे लागतील. अशा तरुणांसाठी अकादमीचे अभ्यासक्रम रोजगाराची संधी देणारे ठरतील. खरे तर एक चांगला व्यावसायिक शेतकरी घडविण्यासाठीही पायाभूत अभ्यासक्रमाची आवश्यक आहे. ज्याला काहीच येत नाही, त्याने शेती करावी या धारणेने सर्वाधिक नुकसान केलेय. शेतीलाच सर्वाधिक स्किल्ड मनुष्यबळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, सह्याद्री कंपनी आणि टाटा स्ट्राईव्ह योग्य पाऊल उचलले आहे आणि प्रत्यक्षात कामही सुरू केले आहे. स्किल अकादमीतून नुकतीच ''रिटेल स्किलिंग''ची पहिली बॅच बाहेर पडली. त्यात पुढील रोजगारभिमुख कोर्सेसचा समावेश होता- १. रिटेल सेल्स असोसिएट २. एफएमसीजी सेल्स असोसिएट ३. इन स्टोअर असोसिएट ४. फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी मॅनेजर, ५. ॲग्री फील्ड ऑफिसर. सर्व प्रशिक्षिणार्थींना पतंजली, सह्याद्री फार्म्स रिटेल, टाटा स्टार बझार, टाटा स्टार बक्स आदी नामांकित कंपन्यात नोकऱ्याही मिळाल्या आहेत. प्लेसमेंट रेशो शंभर टक्के आहे. "स्किल अकादमीसाठी सह्याद्री फार्मद्वारे सर्व प्रकार पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यात क्लास रूम्स, प्रयोगशाळा, निवासी सुविधासह अन्य सर्व सुविधा या आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्सप्रमाणे असतील. प्रशिक्षितांना टाटा समूहाच्या कंपन्यांत तसेच सह्याद्री फार्म्समध्ये १०० टक्के प्लेसमेंट मिळेल, याची काळजी घेण्यात येईल. प्रारंभीच्या वर्षांत ॲग्री रिटेल सेक्टरसाठी ''मार्केटिंग एक्झिक्युटिवज् '' आणि ग्रामीण कंपन्यांना फार्म ऑपरेशन्ससाठी ''ॲग्रिकल्चर फील्ड एक्झिक्युटिवज्'' उपलब्ध व्हावेत, यासाठी अकादमीत कोसेर्स उपलब्ध आहेत," असे सह्याद्री फार्म्सचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे सांगतात. ''शेतकरी कंपनी संचालकांचा कौशल्यविकास'' हा आणखी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम सह्याद्री कंपनी व टाटा स्ट्राईव्ह यांच्या स्किल अकादमीने हाती घेतला आहे. अकादमीत शेतकरी कंपनी संचालकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. दहादिवसीय ट्रेनिंगमध्ये व्यवस्थापकीय (managerial) व कामकाजसंबधीच्या (operational) कौशल्यविकासावर भर असेल. देशात औद्योगिक क्षेत्रातील कौशल्यविकासात ''टाटा स्टाईव्ह'' अग्रणी आहे. सेवा-उद्योग क्षेत्रासाठी जे कौशल्यविकासाचे काम केले तेच आता टाटा स्ट्राईव्हला शेती क्षेत्रात करायचे आहे. ''सह्याद्री''कडे जो प्रॅक्टिकल नॉलेज बेस आहे, त्याचा उपयोगवरील ट्रेनिंगच्या आशय नियोजनासाठी केला जाईल. शिवाय, विविध कमोडिटीजमध्ये काम करणारे ॲग्रिप्रेन्यूर्स, ऑफिशियल्स, एक्स्पर्ट्स आदींकडील ज्ञान आणि कौशल्याचा अभ्यासक्रम आखणीसाठी उपयोग करून घेतला जात आहे.  शेतकरी कंपन्यांच्या संचालकांचा कौशल्यविकास ही वेगळी गोष्ट आहे. इथे उद्योजक घडविण्याचे आव्हान आहे. खरे तर ''सह्याद्री''चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे राज्यभरात होतच आहे. पण, आता अधिकृत प्लॅटफॉर्म तयार होतोय, ही मोठी गोष्ट आहे. कोणतीही कंपनी कागदावर स्थापन होते खरी; मात्र प्रत्यक्षात फिल्डवर कामकाजासाठी उद्योजकच असावे लागतात. एक उद्योजक चांगला मॅनेजरला नोकरीस ठेऊ शकतो, पण त्यासाठी आधी उद्योजक घडणे गरजेचे असते. महाराष्ट्रात शेतमालनिहाय मूल्य साखळीमध्ये (व्हॅल्यू चेन) काय संधी आहेत आणि आपण त्या कशा टॅप करू शकतो. त्यासाठी नेमके कुठले कौशल्य आत्मसात करावे लागतील, यावर भर द्यावा लागणार आहे.   उदा. सोयाबीनसारख्या आंतरराष्ट्रीय कमोडिटीमध्ये जर काम सुरू करायचे असेल, तर पुढील प्रकारच्या व्यवस्थेसंबधी कौशल्य असावे लागतात. १. मालखरेदी-सोर्सिंग २. प्राथमिक प्रक्रिया ३. थेट विक्री. या प्रक्रियेत छोटेखानी मार्केट यार्डसह वजनकाटे व गोदाम व्यवस्था; दीर्घकालीन स्टॉकसाठी वेअरहाउसिंग, बॅंक कर्ज व कोलॅटरल; पिकासंबंधी शासकीय योजना आदी बाबी हाताळण्यासाठी अत्यंत कुशल अशा नेतृत्वाची  गरज असते. भविष्यात मोठे काम उभे करायचे  असेल तर त्यात थेट सोयाबीन निर्यात, सेकंडरी प्रोसेसिंग (एक्स्ट्रॅक्शन, तेल व डीओसी उत्पादन व विक्री), डीओसी निर्यात आदी घटक अंतर्भूत होतात.  या जोडीला संबंधित पिकातील वायदेबाजारातील कल आणि देशांतर्गत मागणी व पुरवठ्याचे बॅलन्सशिट आदी गोष्टींचीही जाण असते क्रमप्राप्त ठरते. शेतकरी कंपनीच्या संचालकास कुशल करणे म्हणजे, तो ज्या शेतमालात काम करणार आहे, त्याबाबत त्यास साक्षर करणे होय. नेमके तेच आव्हान आता ''सह्याद्री'' आणि टाटा स्ट्राईव्ह पुढे आहे. कौशल्यविकासातून संपत्तीनिर्माण करता येते. तुम्ही एकदा शेतीसंबंधी व्यापार - उद्योगाची कौशल्य आत्मसात केली की गावातला पैसा गावातच खेळू लागतो आणि तो वृद्धींगत होत जातो, यातूनच मोठमोठी भांडवली साधने उभी राहतात आणि सामूहिक संपत्ती निर्माण होते. - विलास शिंदे,  व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स कंपनी, नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com