अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते प्रमाण कारणीभूत

जागतिक हवामान बदलामुळे गेल्या १०० वर्षांत तापमानात १ अंशांची वाढ होत आहे. अतिरिक्त तापमान वाढीमुळे अतितीव्रतेची हवामान स्थिती निर्माण होऊन ढगफूटी, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट होण्याची शक्यता आहे. - नहुष कुलकर्णी, शास्त्रज्ञ,भारतीय हवामान विभाग, पुणे.
हवामान
हवामान

पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब) प्रमाण गेल्या दशकामध्ये वेगाने वाढले आहे. दहा वर्षांत हा वेग अाणखी वाढणार आहे. कर्बाची वाढती पातळी हा घटक जागतिक तापमान वाढीसह, वादळे, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळासारख्या हवामानातील अतितीव्रतेची स्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर, शेतीवर अनिष्ठ परिणाम होत असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय व्यवस्थापन संस्थेच्या (नोआ) अभ्यासानुसार वातावरणीय कर्बाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.  २०१७ मध्ये वातावरणातील कर्बाचे सरासरी प्रमाण उच्चांकी ४०५ पार्ट्स पर मिलीयनपर्यंत (पीपीएम) पोचले होते. कोळसा, तेल आदी जिवाष्म इंधनांच्या ज्वलन आदींमुळे वातावरणातील कर्ब वाढत आहे. गेल्या ६० वर्षातील कर्बाच्या वाढीचे प्रमाण नैसर्गिक वाढीपेक्षा १०० पटींनी अधिक आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी दहा लाख वर्षांत वनस्पतींना वातावरणातील जेवढा कर्ब लागेल, तेवढा पुढील काही शतकांमध्ये वातावरणात सोडला जाईल, असेही ‘नोआ’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २००० मध्ये वातावरणीय कर्बाचे प्रमाण ३६० पीपीएम, तर २०१० मध्ये ३८० पीपीएम होते. २०२० मध्ये वातावरणातील कर्बाचे प्रमाण ४२५ पीपीएमपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २०१७ मध्येच हे प्रमाण ४०५ पीपीएम झाले आहे. गेल्या १०० वर्षांमध्ये औद्यागिक क्रांती झाल्यानंतर जगभराच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढले असल्याचे जागतिक हवामान संस्थेच्या अहवालातून दिसून आले आहे. कर्बाच्या वाढीमुळे जागतिक तापमान वाढ होत असून, हे सर्वात घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय हवामान विभागा(पुणे)चे शास्त्रज्ञ नहुष कुलकर्णी म्हणाले, की सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. सजीव अधिवास असलेली पृथ्वी ही ऊर्जा घेते. सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेपैकी ७० टक्के ऊर्जा जमिनीवर येते, तर ३० टक्के वातावरणात शोषली तसेच परावर्तीत केली जाते. वातावरणात शोषल्या जाणाऱ्या ऊर्जेमुळे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेचे दाब यावर हवामान घटकांवर परिणाम होतो. तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होऊन कमी दाबाचे पट्टे, क्षेत्र तयार होते. मॉन्सूनचा कालावधीत इतर स्थानिक घटक पोषक ठरल्यास त्या क्षेत्रात पाऊस पडण्यास लाभ होतो. जागतिक हवामान संघटनेच्या अभ्यासानुसार सूर्यावरील काळे डाग (ब्लॅक स्पॉट) परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर होत असतो. दुष्काळ, अतिपाऊस हे घटक सूर्यावरील या काळ्या डांगा संबंधित असून, १२ वर्षांच्या या चक्रामध्ये सर्व घटना घडत असतात. सूर्याची ऊर्जा एकसंघपणे मिळत असली तरी, मानवी हस्तक्षेप तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. यात वाहने, उद्योगांबरोबरच, पीक अवशेष जाळणे यासह विविध कारणांमुळे वातावरणात जाणाऱ्या विविध घातक वायुच्या उत्सर्जनामुळे तापमान वाढत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक हवामान बदलामुळे गेल्या १०० वर्षांत तापमानात १ अंशांची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी धृवीय बर्फ वितळत असून, समुद्रातील पाणी पातळी, पाण्याच्या प्रवाहातही बदल होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त तापमान वाढीमुळे अतितीव्रतेची हवामान स्थिती निर्माण होऊन ढगफुटी, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट होण्याची शक्यता असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com