परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची हेळसांड

तलाठी, अन्य गावपातळीवरील कर्मचारी गावात यायला तयार नाहीत. त्यामुळे पीककर्जासाठी अर्ज द्यायचा तरी कुणाकडे. पेरणी तोंडावर आलेली, पण अजून पीककर्ज मिळालेले नाही. संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावे. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज वाटप करावे. - पंडित थोरात, शेतकरी, खानापूर. पीककर्ज मागणीसाठी सध्याच्या पध्दतीत बदल करावा. लिंकव्दारे ऑनलाइन नोंदणी सुरु करावी.त्यामुळे गावातूनच पीककर्जाची मागणी करता येईल. - केशव आरमळ, मांडवा. शेतकऱ्यांनी पीककर्जसाठी केलेल्या अर्जाची बॅंकनिहाय माहिती घेतली जात आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - पांडुरंग निनावे, जिल्हा अग्रणीबॅंक व्यवस्थापक, परभणी.
Care of farmers at the mouth of sowing for crop loan in Parbhani district
Care of farmers at the mouth of sowing for crop loan in Parbhani district

परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज मागणी अर्ज घेण्यासाठी गावांत येत नाही. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची हेळसांड सुरु आहे. ऑनलाइन पध्दतीने अर्ज घेऊन पीककर्ज वाटपाला गती द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली. 

दरम्यान, यंदाच्या खरिपात १ हजार ५६७ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजवर २७ हजार १५० शेतकऱ्यांना ९८ कोटी २१ लाख रुपये (६.२७ टक्के) एवढे पीक कर्जवाटप झाले आहे. कोरोना रोखण्यासाठी यंदा खरीप पीककर्जासाठी बॅंकांमधील शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या parbhani.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पीककर्ज मागणी अर्जाचा नमुना उपलब्ध केला आहे. हा अर्ज डाऊनलोड करावा किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यावा. तो आवश्यक कागदपत्रांसह सबंधित तलाठयाकडे सादर करावा. तलाठ्यांनी गावनिहाय अर्ज संकलित करुन ते तहसील कार्यालयात जमा करावे. 

संबंधित बँकांनी तहसिल कार्यालयाकडील अर्ज प्राप्त करुन घ्यावे. त्यावर पुढील कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले. परंतु, या आदेशाकडे अनेक गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या कर्मचाऱ्यासह सरपंच दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यालयात अद्याप पीककर्जाचे अर्ज उपलब्ध झालेले नाहीत. काही ठिकाणी अर्ज उपलब्ध झाले. परंतु, तलाठी, अन्य कर्मचारी ते अर्ज जमा करुन घेत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत. 

पेरणीसाठी बि-बियाणे, खते खरेदीसाठी वेळेवर पीककर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आजवर पीककर्जासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येची माहिती देखील संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नाही. पीककर्ज वाटपाची गती अतिशय संथ आहे. पेरणीची वेळ जवळ येऊन ठेपलेली असताना पीककर्जाअभावी शेतकऱ्यांची हेळसांड सुरु आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com