खत उद्योगाचे सावध नियोजन

गेल्या हंगामातील पहिल्या लॉकडाउनमध्ये खतांची वाहतूक विस्कळीत झालेल्या खत उद्योगाला यंदा लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात अद्याप तरी अडचणी आलेल्या नाहीत.
Careful planning of the fertilizer industry
Careful planning of the fertilizer industry

पुणे  : गेल्या हंगामातील पहिल्या लॉकडाउनमध्ये खतांची वाहतूक विस्कळीत झालेल्या खत उद्योगाला यंदा लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात अद्याप तरी अडचणी आलेल्या नाहीत. मात्र आज (ता. १५) पासून जाहीर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये खरिपापूर्वी विक्रेत्यांपर्यंत पुरेशी रासायनिक खते पोहोचविण्यासाठी कंपन्यांकडून सावधपणे नियोजन केले जात आहे. 

गेल्या हंगामात लॉकडाउन घोषित होताच विदेशातून जहाजांद्वारे आलेली खते व कच्चा माल काही बंदरांमध्येच अडकून पडला होता. तेथे कामकारांची टंचाई होती. त्यानंतर राज्यात खते घेऊन येणाऱ्या रेल्वे रेकचे वेळापत्रक कोलमडून पडले होते. रेक आले तरी विविध रेक पॉइंटवर खते उतरवून घेण्यास माथाडी कामगार उपलब्ध नव्हते. त्यामुळे कंपन्या हैराण झाल्या होत्या. रेक पॉइंटपासून विक्रेत्यांपर्यंत खते पोहोचविण्यासाठी मालवाहतूकदारांकडे चालक, हमालांची टंचाई होती. त्यामुळे गेल्या लॉकडाउनमध्ये खत कंपन्या व कृषी विभागाला प्रचंड धावपळ करावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांशी ठिकठिकाणी संपर्क साधून या समस्या सोडव्या लागल्या. यंदा मात्र ही स्थिती येणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

“राज्यात शेतकऱ्यांना ३५ ते ३७ लाख टन खते हवी असतात. यंदा ३१ मार्चअखेर २१ लाख टन खते आधीच शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांची अजिबात टंचाई जाणवणार नाही. राज्यातील ६१ रेक पॉइंटवर साधारणतः ५० कंपन्यांकडून खते उतरवली जातात. सध्या खतांची वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. कंपनी ते विक्रेता या दरम्यान सध्या खतांचा प्रवास होत असून, जूनच्या पहिल्या आठवडयापासून विक्री सुरू होईल,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

“गेल्या लॉकडाउनमध्ये खते हलविण्यासाठी मजूर, वाहतूकदार, चालक उपलब्ध होत नव्हते. कृषी विभागाने स्वतः पुढाकार घेत विशेष ओळखपत्रांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. दुकाने देखील अनेक भागांमध्ये पहिल्या टप्प्यात बंद होतील. ही दुकाने उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला गेला होता. यंदाच्या लॉकडाउनमध्ये या अडचणी येणार नाहीत. कारण, कृषी संबंधित कामकाजावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत याची दखल विविध जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी गुजरातच्या बंदरांमधील मालाच्या हालचाली (लोडिंग-अनलोडिंग मूव्हमेंट्‍स) अखंडितपणे होणे महत्त्वाचे असते. सध्या मुंद्रा, कांडला, पिपावा या बंदरांमधून खत कंपन्यांना अडचणी आलेल्या नाहीत. तसेच मुंबईच्या जेएनपीटी किंवा खत कंपन्यांच्या प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्पांमध्येही अद्याप व्यत्यय आलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण न केल्यास राज्यात खताच्या पुरवठ्यात अडथळे येण्याची शक्यता नाही, असा अंदाज खत उद्योगातून व्यक्त केला जात आहे. 

लॉकडाउन, कोरोना स्थितीचा राज्यातील खत पुरवठ्यावर गेल्या हंगामासारखा परिणाम होण्यासारखी स्थिती यंदा सध्या तरी नाही. मात्र शेतकऱ्यांनी आता बाजाराची स्थिती, मागणी, बाजारभाव पातळी याचा अभ्यास करून खते आणि सिंचन व्यवस्थापनाचे नियोजन करावे. शेतीमालाची मागणी कमी झाल्याने किती पैसा कशात गुंतवावा यात शेतकऱ्यांचे कसब लागणार आहे. तसेच खतांच्या दुकानात जाताना मुखपट्टी, सामाजिक अंतर व इतर सर्व प्रकारची काळजी शेतकऱ्याने घ्यावी. - विजयराव पाटील, सहयोगी उपाध्यक्ष, स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिडेट 

गेल्या लॉकडाउनमधील अडीअडचणींचा अभ्यास करून यंदा निविष्ठा वितरण सुरळीत राहण्यासाठी राज्यभर काळजी घेतली जात आहे. खतांची वाहतूक यंदा व्यवस्थित सुरू आहे. गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांना पुरेशी रासायनिक खते मिळतील, असे नियोजन कंपन्या व कृषी विभागाकडून सुरू आहे. - अजय कुलकर्णी, कृषी उपसंचालक (खते विभाग), कृषी आयुक्तालय 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com