खत भेसळप्रकरणी ‘कृभको’वर गुन्हा

fertilizer
fertilizer

पुणे : कृषी खात्याने खत भेसळखोरांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी धाडी टाकून नकली डीएपीसहित इतर खते जप्त केली आहेत. एका प्रकरणात थेट ‘कृभको’च्या महाव्यवस्थापकाविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.  कृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रणक संचालक विजयकुमार घावटे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अप्रमाणित खतांच्या विरोधात मोहिम उघडण्यात आली आहे. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रामचंद्र शेळके यांनी कोल्हापूर भागात दोन धाडींमध्ये भेसळीचा माल उघडकीस आणल्यानंतर नामांकित कंपन्यांचा मालदेखील भेसळीसाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही भागात इफकोच्या खतात कृभकोचे खत मिसळून भलतीच ग्रेड तयार करून विकली जात आहे. पाडळी खुर्द येथील जनसेवा विविध कार्यकारी सोसायटीच्या गोदामातून जप्त केलेल्या नकली डीएपीमुळे हा गोलमाल उघड झाला. तेथे ‘कृषक भारती को ऑपरेटिव्ह कंपनी’च्या १८:४६:० या डीएपीच्या ग्रेडमध्ये ‘इफको’च्या १०:२६:२६ ग्रेडची भेसळ केली जात होती. कृषी खात्याने या दोन्ही खतांचे नमुने तपासले असता त्यात ‘डीएपी’ऐवजी ‘सिंगल सुपर फॉस्फेट’ आढळले.  “डीएपीच्या नावाखाली शेतकऱ्यांना एसएसपी विकून पैसे कमावणारी टोळी यात असल्याचा संशय आहे. त्यामुळे कृभकोचे महाव्यवस्थापक जगदीश प्रसाद वर्मा (नोएडा, उत्तर प्रदेश) व जनसेवा सोसायटीचे मारुती नामदेव पाटील (पाडळी, करवीर, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  दुसऱ्या कारवाईत राजस्थानमधील बोगस खताचा साठा कागलच्या ‘यशोधन ॲग्रो सर्विसेस’मध्ये जप्त करण्यात आला. या प्रकरणात ‘जयपूर बायो फर्टिलायझर्स’कडून परवाना नसतानाही शेतकऱ्यांना ‘सुपर पोटॅश’च्या नावाखाली खत विकले जात होते. या खताची तपासणी केली असता उसाच्या मळीपासून काढलेले घटक आढळले. या प्रकरणात जमीर अब्दुलअजी नाईक (खर्डेकर चौक, कागल, जि. कोल्हापूर) व अधिकारी महंमद अस्लम (बजरंग नगर, ओझर, जि. नाशिक) अत्यावश्यक वस्तू कायदा, भारतीय दंड विधान तसेच खत नियंत्रण आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  दर्जेदार खते तेही पावतीने खरेदी करा   “बोगस खताला आळा घालण्यासाठी जोरदार प्रयत्न राज्यभर सुरू आहेत. तथापि, शेतकऱ्यांनी चांगल्या कंपन्यांची दर्जेदार खते घेण्याचा प्रयत्न करावा. परराज्यांतील अनोळखी कंपन्यांचा माल शक्यतो टाळावा. खरेदीची पावती अवश्य घ्यावी. संशय वाटल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन आयुक्तालयाच्या सूत्रांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com