बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हा

बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हा
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हा

पुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कृषी विभागाने जोरदार झटका दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित मिश्रखताचा पुरवठा केल्याबद्दल सहकारमंत्र्यांच्या कंपनीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमंगलवर कडक कारवाई करायची की नाही, याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून कृषी खात्यात काथ्याकूट चालू होता. कृषी आयुक्त सुहास दिवसे व औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला गेला. मराठवाड्यात विकले जाणारे १८:१८:१०, २०:२०:० व १०:२०:२० ग्रेडचे मिश्रखत कृषी खात्याच्या रडारवर होते. या प्रकरणानंतर लाखो रुपयांचे खत जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. “कंपनी कोणाच्याही मालकीची असली, तरी शेतकऱ्यांची फसवणूक हेतूतः होत असल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कामकाज करा, अशा सूचना गुणनियंत्रण निरीक्षकांना देण्यात आल्या. त्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला,” अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे प्रभारी गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे, सहसंचालक प्रतापसिंह कदम, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी केशवराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने ही कारवाई केली. “खत उत्पादन व विक्रीत गंभीर बाबी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सादर करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिलेले आहेत. मेसर्स लोकमंगल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (ए ६१, एमआयडीसी चिंचोली, सोलापूर) या खत उत्पादक कंपनीकडून प्रयोगशाळेतील विश्लेषण अहवालानुसार सहा नमुने अप्रमाणित निघाले. हे प्रकरण गंभीर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत,” असे कृषी खात्याने पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.  लोकमंगल बायोटेकचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ, व्यवस्थापकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४२० व ३४ कलमान्वये तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तीन व सात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी आयुक्तांनी खते, बियाणे, कीडनाशके उद्योगातील को-मार्केटिंगमध्ये गुंतलेल्या ९३ कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे गेल्याच आठवडयात घोषित केले होते. त्यानंतर गुणनियंत्रणाबाबत आणखी कडक कारवाईचे संकेत दिले होते.  ‘लोकमंगल’मुळे खत लॉबीला हादरा मिश्रखत उद्योगातील सर्वांत मातब्बर अशा ‘लोकमंगल’वर गुन्हा दाखल झाल्यामुळे खत लॉबीला मोठा हादरा बसला आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीच्या लोकमंगल उद्योग समूहाने खतनिर्मितीसाठी ‘लोकमंगल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ ही स्वतंत्र कंपनी उघडली आहे. सहा राज्ये आणि एक हजार डिलरचा ताफा, तसेच प्रतिवर्षी २५ हजार टन खतनिर्मितीची क्षमता कंपनीकडे आहे. ‘लोकमंगल बायोटेक’चे  मुख्यालय सोलापूरला असून, खत कारखाना सोलापूर चिंचोली एमआयडीसीत आहे. गुजरात, आंध्र प्रदेश आणि अकोला भागात कंपनीने शाखा उघडल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com