‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक हे कार्य केले आहे. त्यासाठी जी शिक्षा असेल ती भोगायला तयार आहोत. आम्हाला या शेतकऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे. शासनाने हे तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिले नाही तर आठ दिवसांत हजारो शेतकरी राज्यभर आंदोलन करतील. आमच्या या लढ्यात आम्ही सर्व तुरुंगात जायला तयार आहोत. -अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना
एचटीबीटी बियाणे
एचटीबीटी बियाणे

अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड आंदोलन केल्याप्रकरणी कृषी विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी पोलिस तक्रारी केल्या आहेत. सोमवारी (ता. २४) अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे एचटीबीटी कापूस बियाणे लागवड केल्याप्रकरणी हिवरखेड पोलिस ठाण्यात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   तेल्हारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली असून तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललित सुधाकर बहाळे यांच्यासह लक्ष्मीकांत कौठकर, सीमाताई नरवडे, प्रमिला भारसाकळे, प्रज्ज्वल बदरखे, नीलेश नेमाडे, विक्रांत बोंद्रे, सतीश सरोदे, अमोल मसूरकार, गोपाल निमकर्डे, मोहन खिरोडकर, दिनेश गिऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.  भारतीय दंडविधान कलम ४२०, १४३, १८६, १८८, तसेच पर्यावरण संरक्षक कायदा १९८६ च्या कलम ७, ८, ११, १४, बियाणे कायदा १९६६ च्या कलम ७ सर इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ पवार करीत आहेत.  शेतकरी संघटनेने तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या मागणासाठी या भागात दहा जूनपासून ठिकठिकाणी एचटीबीटी बियाणे लागवड आंदोलन सुरू केले आहे. अकोली जहाँगीर या गावात १० जूनला या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आंदोलने केली जात आहेत. सोमवारी तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे लक्ष्मीकांत कौठकार यांच्या शेतात एचटीबीटी बियाणे लागवडीचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रतिबंधित बियाण्याची लागवड करू नये अशी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे कृषी अधिकाऱ्याने म्हटले आहे.  अकोटमध्ये तक्रार दाखल अकोली जहाँगीर येथे १० जून रोजी एचटीबीटी लागवड केल्याप्रकरणी अकोट पंचायत समिती कृषी अधिकारी विठ्ठल धूल यांनी मंगळवारी (ता. २५) पोलिसात तक्रार केली. यानुसार ललित बहाळे, विनोद मोहकार, अविनाश नाकट, नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, प्रमिला भारसाकळे, लक्ष्मीकांत कौठकर, प्रफुल्ल बदरखे, नीलेश नेमाडे व विक्रांत बोंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना तक्रारीत कळविले आहे. श्री. थूल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० जून रोजी अकोली येथे ललित बहाळे यांच्या शेतात शासन मान्यता नसलेल्या प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याची जाहीररीत्या लागवड करण्यात आली. लेखी कळविले असतानाही दुर्लक्ष करीत बेकायदा जमाव जमवून पेरणी केली. यावेळी बियाणे जप्त करुन नमुना नागपूर येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. एचटीबीटी बियाण्यामुळे कमी खर्च व अधिक उत्पन्न होते, असे आमिष दाखवून दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे म्हटले आहे.  प्रतिक्रिया कृषी विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले त्यातील फसवणूक, जमाव अशा काही गुन्ह्यांना आमचा विरोध आहे. आम्ही कुणाला फसविलेले नाही. आमचा हा सविनय लढा आहे. पर्यावरण कायद्याला आम्ही विरोध करणार नाही. त्याविरुद्ध लढा देऊ. -ललित बहाळे, प्रवक्ता, शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com