agriculture news in marathi, cashew production will decrease, sindhuduraga, maharashtra | Agrowon

काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणार

एकनाथ पवार
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पाच एकर जागेत मी काजूची लागवड केली होती. लागवड केल्यानंतर सात ते आठ  वर्ष झाली असून ही सर्व झाडे उत्पादन देत होती; परंतु यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर काजू बागेतील ७० टक्के झाडे फांदीमर, शेंडेमरने पूर्ण वाळून मरून गेली आहेत. ही बाग उभी करण्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च केले होते.
- सुरेश गंगाराम गुरव, ऐनारी, ता.वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी, क्यार वादळ आणि ऑक्टोबर अखेरपर्यंतच्या मुसळधार पावसाचा प्रतिकूल परिणाम काजूपिकावर झाला आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांनी राज्यातील काजूबागा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम काजू हंगामावर होणार असून किमान ३० टक्के उत्पादन घटून सुमारे १५०० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

कोकणातील चार जिल्हे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यांत प्रामुख्याने काजू उत्पादन घेतले जाते. राज्यातील १.९१ लाख हेक्टर क्षेत्र काजूपिकांखाली आहे. त्यांपैकी अधिकतर क्षेत्र कोकणातील जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्गमध्ये ६७ हजार ६५९ हेक्टर क्षेत्र असून त्यातील उत्पादनक्षम क्षेत्र ४९ हजार हेक्टर आहे; तर रत्नागिरीत ९२ हजार ६०० हेक्टर असून, त्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. उर्वरित क्षेत्र रायगड ,पालघर व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा या दोन तालुक्यांतील आहे. प्रत्येक जिल्ह्याची उत्पादन क्षमता कमी जास्त असून राज्याचे सरासरी काजू उत्पादन २.६९ लाख मेट्रिक टन आहे.

कोकणात आंब्यापाठोपाठ काजू पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उलाढाल १ हजार २०० कोटी ते १ हजार ५०० कोटींपर्यंत होते. रत्नागिरी जिल्ह्यात काजूची उलाढाल सुमारे २ हजार २०० कोटींपर्यंत जाते. मात्र या वर्षीचा काजू हंगाम धोक्यात आला असून, काजू उत्पादकांचे अर्थकारण यंदा कोलमडणार आहे.  

काजू पिकातून सुमारे ५ हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. या वर्षी सरासरी काजू पिकाचे आजमितीस ३० नुकसान झाल्याने १५०० हजार कोटींवर फटका बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यात काजू चांगला होतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत हापूसपेक्षा कित्येक पटीने काजूची लागवड या भागात वाढली आहे. शेकडो बागायतदार पूर्णतः काजू लागवडीवर अवलंबून आहेत.
 
काजू पिकाचे नुकसान...

 • जुलैअखेर, ऑगस्ट प्रारंभीच्या अतिवृष्टीचा झाडांना फटका
 • १० ते १५ वर्षांची झाडे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाळून गेली
 • पाण्याचा निचरा न होणाऱ्या जागेतील बागा अक्षरशः काळवंडल्या
 • क्यार, महाचक्रीवादळामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाचा झटका
 • ऑक्टोबरमधील पहिली काजू पालवी आणि नंतरचा मोहर काळही लांबला
 • ६० टक्के काजू बागांना अद्याप पालवी आलीच नाही; चिंता वाढली
 • बागांना फांदीमर, शेंडेमर, पानगळ, ढेकण्या आदींचा प्रादुर्भाव
 • पावसामुळे शेतकऱ्यांना फवारण्या देखील करता आल्या नाहीत 
 • काजूचा हंगाम एक ते दीड महिना लांबणीवर जाणार
 • लांबलेला हंगाम उन्हाळ्यात सापडणार; नुकसानीची शक्यता

दृष्टिक्षेपात काजू लागवड...

 •  प्रमुख जिल्हे : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि कोल्हापूर
 • हेक्टरी लागवड : सरासरी २०० झाडे
 • एका झाडापासून सरासरी उत्पादन : ५ ते १५ किलो
 • काजूला मिळणारा दर : सरासरी १२० ते १७० रूपये. 
 • हेक्टरी उत्पन्न  ३ लाख रुपये

 प्रतिक्रिया
पाऊस लांबल्यामुळे या वर्षी आंबा, काजू पीक उशिराने होणार हे जवळपास निश्‍चित आहे. काही भागातील काजूबागाचे पावसामुळे नुकसान झाले; परंतु पाण्याचा निचरा न होणे, झाडांना सूर्यप्रकाश न मिळणे अशा प्रकारामुळे या झाडांना मर आली आहे. सध्या काजू मोहरण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे तूर्तास नुकसान किती होईल, याचा ठोकताळा मांडता येणार नाही.
- डॉ. बी. एम. सावंत, संचालक, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

बदलत्या हवामानाचा फळपिकावर मोठा दुष्परिणाम होत आहे. सध्या ढेकण्या, रोठा या कीडरोंगामुळे  काजू पिकाचे नुकसान झाले आहे. या कीडरोगांना आळा घालण्यासाठी फळमाश्‍यांना ज्याप्रमाणे सापळे आहेत तशा पद्धतीचे सापळे निर्मितीचे संशोधन होणे आवश्‍यक आहे.
- प्रा. विवेक कदम, कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी, जि. सिंधुदुर्ग.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काजू झाडांना पालवी येणे अपेक्षित होते; परंतु सध्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात काजूंना पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही काजू मोहोराला कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडणार आहे. सुरुवातीला आलेला मोहोर राहिला नाही तर  मोठे नुकसान होते. यावर्षी काजूचे किमान ३० टक्के नुकसान होणार हे निश्‍चित आहे.
- प्रकाश पांचाळ, कोकीसरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग.

हवामानबदलाचा परिणाम काजू पिकावर होण्याची दाट शक्यता आहे. काजूला पोषक थंडी या कालावधीत आवश्‍यक होती, ते वातावरण सध्या दिसत नाही. त्याचा परिणाम काजूच्या उत्पादनावर होणार आहे.
- विवेक बारगीर, बागायतदार, मांजरे, जि. रत्नागिरी.

बदलत्या वातावरणामुळे काजूच्या झाडांना वाळवी लागत आहे; तसेच पानेही झडली आहेत. बुरशी येत असल्याने मोहोर येण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. हंगाम लांबल्याने भविष्यात काजू उत्पादनास अडथळे येणार आहेत. पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे यंदा हंगाम जाम अडचणीत आला आहे
- दत्ताराम दळवी, गुडवळे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...