काजू बीच्या दरात मोठी घसरण 

जिल्ह्यात काजू बीची आवक वाढल्यानंतर दरात मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीला १४०-१३० रुपये असलेला दर या आठवड्यात अवघ्या १०० ते १०५ रुपयांवर आला आहे.
cashew
cashew

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काजू बीची आवक वाढल्यानंतर दरात मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीला १४०-१३० रुपये असलेला दर या आठवड्यात अवघ्या १०० ते १०५ रुपयांवर आला आहे. आठवड्याला १० रुपयांनी दर कमी होत असल्यामुळे ज्या बागायतदारांनी अजूनही काजू बीची विक्री केलेली नाही त्यांच्यामध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काजू खरेदी- विक्री हंगामाला सुरुवात झाली. परंतु सुरुवातीला काही ठरावीक भागातीलच काजू विक्रीसाठी येतो. परंतु मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून काजू बी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होते. या वर्षी फेब्रुवारीला दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यांत १४० रुपये दराने काजू बीची खरेदी सुरू झाली. त्याच वेळी इतर तालुक्यांत १३० ते १२० रुपये दराने काजू बीची खरेदी व्यापारी, कारखानदारांनी सुरू केली होती. परंतु त्यानंतर जसजसे बाजारपेठेत काजूची आवक वाढत गेली तसतशी काजू बीच्या दरात घसरण होऊ लागली.  व्यापाऱ्यांनी काजूचे आठवड्याला प्रतिकिलो ५ ते १० रुपयांच्या पटीत कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सध्या १४० रुपयांवर असणारा दर आता दोडामार्ग आणि सावंतवाडीत १२०, तर उर्वरित जिल्ह्यात ११० ते १०० रुपयांपर्यंत घसरला आहे. वेंगुर्ला चार जातींच्या काजू बीला तर काही व्यापारी १०० रुपये दर देण्यास तयार होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर वेंगुर्ला सात जातीच्या काजूला १२० ते ११५ रुपये दर काही व्यापाऱ्यांकडून दिला जातो.  गेल्या वर्षी कोरोनामुळे काजूचे दर अगदी ८५ ते ९० रुपयांपर्यंत आले होते. त्यामुळे काजू बागायतदार अडचणीत आले होते. अनेक बागायतदार कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे या वर्षी काही बागायतदारांनी साठा न करता काजू बीची विक्री सुरुवातीपासून करण्यास सुरुवात केली. परंतु मोठे बागायतदार आहेत त्यांनी काजू बीची साठवणूक करून ठेवली आहे. या बागायतदारांकडे शेकडो टन काजू आहे. प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर कमी झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान या बागायतदारांचे होत आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या सर्व बागायतदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण दिसून येत आहे.  दराबाबतची बैठकही निष्फळ  काजू दरासंदर्भात चर्चा करण्यासाठी सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांनी काजू उत्पादक शेतकरी, खरेदी करणारे व्यापारी, कारखानदार यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. परंतु या बैठकीला दुसऱ्यांदा कारखानदार आणि व्यापारी गैरहजर राहिले. त्यामुळे ही बैठकही निष्फळ ठरली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com