रत्नागिरीत तारण योजनेअंतर्गत १९ टन काजू बीचा लिलाव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  ः हवामानातील बदलामुळे काजू उत्पादनावरही परिणाम झाला आहे. उत्पादन कमी असल्याने दरही सुरवातीपासून कमी राहिले आहेत. आतापर्यत जिल्ह्यातील शेतमाल तारण योजनेतंर्गत ९० टन काजू तारण ठेवण्यात आला होता. मात्र अद्याप १९ टन काजूबीचा लिलाव झाला असला, तरी ७६ टन काजू शिल्लक आहे. दिवाळीपर्यत काजूचा लिलाव होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. काजूचे उत्पादन कमी असताना या वर्षी काजुगराला उठाव नसल्यामुळे दरही कमी होता. शेतकऱ्यांना काजू बीमधून चांगला भाव मिळावा, यासाठी गतवर्षीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्ह्यात तारण योजना राबविली. पाच कोटी रुपयांचे उद्दिष्ट बाजार समितीने ठेवले होते. मात्र या वर्षी उत्पादनच अल्प असतानाही ९० टन काजू तारण ठेवण्यात आला.

तालुक्याच्या ठिकाणी बाजार समितीतर्फे भाडे तत्त्वावर गोदामे घेण्यात आली आहेत. काजू बी गोदामात ठेवण्यापूर्वी तपासणी केली जाते. त्यातील बाष्पाचे प्रमाण कमी असेल, तर ती साठवून ठेवता येईल. अन्यथा, खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी आवश्यक यंत्रणा समितीने गोदामामध्ये उपलब्ध करून दिली आहे. बाजार समितीकडे ७६ लाखांचा काजू शेतकऱ्यांनी तारण ठेवला आहे.

गतवर्षी काजुगराला १७० रूपये सर्वोच्च दर प्राप्त झाला होता. यावर्षी मात्र सर्वोच्च दर १२० रूपये इतकाच राहिला होता. बाजारभावाच्या ७५ टक्के रकमेनुसार किलोमागे ८५ रूपये दराने शेतकऱ्यांना ७६ लाखाचे कर्जवाटप करण्यात आले. गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ हजार किलो काजू बी तारण ठेवली होती. प्रति किलो १०० रूपये प्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले. जुलैमध्ये १३० ते १४० रूपये दराने काजू बी विकल्यानंतर शेतकऱ्यांना दिलेली तारण रक्कम वजा करून उर्वरित पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com