दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
अॅग्रो विशेष
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर सावट
लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल आठ महिन्यांनी सरू झाले. मात्र जनावरांच्या खरेदी-विक्रीतील अडचणी कायम आहेत.
सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल आठ महिन्यांनी सरू झाले. मात्र जनावरांच्या खरेदी-विक्रीतील अडचणी कायम आहेत. आर्थिक चणचण आणि लम्पी स्कीन रोगाच्या पादुर्भावाचा पशुधन बाजारावर परिणाम झाला असून, बाजारातील उलाढाल तब्बल १५ लाखांनी कमी झाली आहे. तर पशुधनाचे दरही १५ ते २० हजारांनी कमी झाल्याचे चित्र आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज येथील दुय्यम बाजार आवारात पशुधनाचा मोठा बाजार भरतो. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, कर्नाटकातून पशुपालक, व्यापारी पशुधनाच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. बाजारात स्पर्धेतून पशुधनला चांगला दर मिळतो. बाजार खरेदी-विक्री सुरळीत सुरू होती. बाजारात २६ फेब्रुवारी २०२० ला ३६ लाख ९० हजार इतकी उलाढाल झाली होती.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे पशुधनाचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले. त्यानंतर हळूहळू अनलॉक सुरू झाले. त्यामुळे १८ ऑक्टोबरला बाजार सुरू करण्यास परवानगी मिळाली. पहिला बाजार २८ ऑक्टोबरला भरला. या वेळी २१ लाख १३ हजारांची बाजारात उलाढाल झाली.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील, तसेच कोकणातील पशुपालक पशुधन खरेदी-विक्रीसाठी येथील बाजारात येतात. मात्र लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव काही भागांत वाढल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पशुपालकांनी पशुधन विक्रीस आणल्यानंतरही खरेदीसाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांची संख्या कमी होती.
पुढच्या बाजारात खरेदीरांची संख्या वाढेल अशी शक्यता असल्याने पुन्हा पशुपालकांनी जनावरे विक्रीसाठी आणली होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याने पैशांची चणचण, तसेच पशुधनाला लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बाजारात पशुधनाची आवक कमी होऊ लागली. त्याचा परिणाम जनावरांच्या खरेदीवर देखील झाला आहे. त्यामुळे मागणीत घट झाली असून दरही कमी झाले आहेत.
दिवाळीनंतर पशुधनाचा बाजार तेजीत असतो. त्यामुळे पशुपालकांसह व्यापारी बैल, गाई, म्हैशी खरेदीसाठी गर्दी होत असते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच दुधाचे दरही कमी आहेत. तसेच लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारात जनावरांच्या संख्येत घट झाली असल्याचे चित्र आहे. सध्या प्रतिकूल परिस्थितीत दावणीला बांधलेली जनावरे जगविण्याची धडपड सुरू आहे.
बाजारात इतर भागांतून जनावरांची आवकच नाही
बाजारात सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, कोकणासह कर्नाटक राज्यांतून पशुधनाची आवक होते. परंतु लम्पी स्कीन रोगाची भीती पशुपालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालक पशुधन विक्री आणि खरेदीसाठी येत नाहीत. गेल्या चार बाजारांत केवळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून पशुधन आले होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
बाजारावरील परिणाम
- लाॅकडाऊनमुळे पशुधन बाजारावर परिणाम
- व्यवहार ठप्प असल्याने पैशांची चणचण
- लम्पी स्कीन रोगामुळे भीती
- पशुधन खरेदी-विक्रीला कमी प्रतिसाद
- जनावरांची कमी दरात व्यापाऱ्यांकडून मागणी
- बाजारात इतर भागांतून जनावरांची आवकच नाही
- केवळ सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून पशुधन बाजारात दाखल
- दुभत्या जनावरांच्याही मागणीत घट
जनावरांच्या पशुधनाचे सरसारी दर (हजार रुपये)
पशुधन | २६ फेब्रुवारी | २५ नोव्हेंबर |
गाय | ६० | ४० |
म्हैस | ५० | ४५ |
बैल | ५० | १५ |
शेळ्या-मेंढ्या | ९ | ७ |
बाजारातील पशुधनाची आवक (कंसात विक्री)
पशुधन | २६ फेब्रुवारी | २५ नोव्हेंबर |
मोठे पशुधन | ४४१(१८१) | ४२२(१०६) |
लहान पशुधन | २४७(१८७) | ३३८ (१४०) |
उलाढाल | ३६.९० लाख | २१.५० लाख |
प्रतिक्रिया
दावणीला सहा जनावरे आहेत. त्यापैकी एक गाय विकायची आणि नवीन चांगली गाय खरेदी करायची या हेतून बाजारात आलो आहे. परंतु मागणीच नाही.
- संजय बेंद्रे, शिरोळ, जि. कोल्हापूर
दिवाळीनंतर जनावरांच्या दरात वाढ होते. चांगला दर मिळतो. त्यामुळे जनावरे विक्रीसाठी घेऊन आलो आहे. परंतु लम्पी स्कीन रोगाच्या भीतीने खरेदीसाठी पशुपालकांनी पाठ फिरवली आहे. व्यापाऱ्यांकडून अपेक्षित दर ठरवला जात नव्हता. त्यामुळे जनावरांची विक्री झाली नाही.
- महादेव चौगुले, तानंग, ता. मिरज
बाजारात चांगली जनावरे आली आहेत. परंतु लम्पी स्कीन रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरे खरेदी करण्यास कोणी पुढे येत नाही. त्यामुळे मागणी कमी झाली आहे.
- प्रकाश पाटील, व्यापारी
- 1 of 654
- ››