‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस खरेदी

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी बाजारात कापसाचे दर वाढल्याने या वर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या हमीभाव केंद्रावर आवक होण्याची शक्‍यता नाही.
CCI to buy cotton from open market
CCI to buy cotton from open market

नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी बाजारात कापसाचे दर वाढल्याने या वर्षी भारतीय कापूस महामंडळाच्या हमीभाव केंद्रावर आवक होण्याची शक्‍यता नाही. परिणामी, भारतीय कापूस महामंडळाने यंदाच्या हंगामात खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या या धोरणामुळे स्पर्धा वाढून आणखी कापसात आणखी तेजीचा अंदाज वर्तविला जात आहे. 

नैसर्गिक कारणांमुळे जागतिक स्तरावर कापसाची घटलेली उत्पादकता, परिणामी, रुईच्या दरातील वाढ त्यासोबत डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर अशा अनेक कारणांमुळे कापसात तेजी अनुभवली जात आहे. जागतिक बाजारात ९० सेंट प्रति पाउंड असा रुईचा दर काही दिवसांपूर्वी होता. त्यात वाढ होऊन हे दर मंगळवारी (ता. १२) १२० सेंट प्रति पाउंडवर पोहोचले आहेत. ४० ते ५० हजार रुपये प्रति खंडीचा (दोन कापूस गाठी) दर असताना तो दर आता ६२ ते ६४ हजार रुपये खंडीवर पोहोचला आहे. एका डॉलरची किंमत ७५ रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी देखील कापसाचे दर वाढविण्यास पोषक ठरली आहे. 

या वर्षी केंद्र सरकारने कापसाला ६०२५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. भारतात देखील आतापासूनच कापसातील तेजीचे संकेत जाणकार देत आहेत. एकूण कापसाचा ठोकताळा विचारात घेता १२५० रुपयांचा प्रक्रिया खर्च व व्यापारी नफा वजा जाता कापसाचे दर ७००० रुपये क्‍विंटल राहण्याची शक्‍यता आहे. बाजारात ६५०० ते ७००० रुपये असा दर राहील, असेही कापूस प्रश्‍नाचे अभ्यासक गोविंद वैराळे सांगतात. या साऱ्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर सीसीआयने यंदा खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा निर्णय घेतला आहे.

जागतिक तेजीच्या परिणामी खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभाव ६०२५ रुपयांपेक्षा अधिक राहणार आहेत. हमीभाव केंद्रावर यामुळे किलोभरही कापसाची आवक होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळेच सीसीआयने यंदाच्या हंगामात खुल्या बाजारातून कापसाच्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. परिणामी, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून हमीभाव केंद्र उघडत खरेदीचा प्रश्‍नच राहणार नाही. पणन महासंघाला हमीभाव केंद्र सुरू करावयाची असल्यास राज्य सरकारच्या निधीतून किंवा स्वनिधीतून ते सुरू करतील. आमची तयारी मात्र यंदा खुल्या बाजारातून कापूस खरेदीची आहे.  -प्रदीपकुमार अग्रवाल, अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) 

पणन महासंघाच्या संचालक मंडळाची शुक्रवारी (ता. २९) बैठक बोलावण्याचे प्रस्तावित आहे. त्या वेळी सीसीआयने घेतलेली खुल्या बाजारातील खरेदीची भूमिका आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा होईल. सीसीआय व्यवस्थापनासोबत देखील त्यापूर्वी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतरच पणन महासंघ आपली भूमिका ठरविणार आहे. आजवर आम्ही स्वतंत्र खरेदी न करता सीसीआयकरिता एजंट म्हणूनच खरेदी केली आहे. - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ 

सीसीआयने खुल्या बाजारातून खरेदीचा घेतलेला निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुखद धक्‍का देणारा आहे. यामुळे निश्‍चितच स्पर्धा वाढून सध्याच्या दरापेक्षा १०० ते २०० रुपयांची तेजी निर्माण होईल. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. - गोविंद वैराळे, कापूस विषयाचे अभ्यासक

राज्याची कापूस लागवड स्थिती व उत्पादन  या वर्षी ३९ लाख हेक्‍टर  ७५ लाख गाठी उत्पादन अपेक्षित

गेल्या वर्षी  ४३ लाख हेक्‍टर  ८० लाख गाठी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com