सीसीआयची उतारा, घटबाबतच्या अटी बदलण्यास असमर्थता 

आमच्या असोसिएशनतर्फे मी स्वतः सीसीआयच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यांनी करार प्रक्रियेत बदल करणे शक्‍य नाही, असे मला सांगितले. कापूस खरेदी सुरू करण्यासंबंधी विनंतीदेखील त्यांनी केली. तसेच राज्य जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशननेदेखील सीसीआयच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून घट, उताऱ्याच्या अटी बदलण्याची विनंती केली. त्यांनाही सीसीआयने उत्तर देवून अटी बदलण्यास असमर्थता दाखविली. शेतकरी हित लक्षात घेऊन खानदेशात सीसीआयचे काही खरेदी केंद्र सुरू करण्याचे आवाहन आम्ही केंद्रधारक कारखानदारांना केले आहे. - प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन
cotton procurement
cotton procurement

जळगाव ः कापूस खरेदी केंद्रधारक जिनींग प्रेसिंग कारखानदारांनी सप्टेंबरमध्ये करार प्रक्रियेत अटी व निकष मान्य केल्या आहेत. त्यात आता बदल करणे शक्‍य नाही. कापूस उत्पादक शेतकरी महत्त्वाचा आहे, असे स्पष्टीकरण देत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीसंबंधी उतारा व घटीच्या अटी बदलण्यास असमर्थता दाखविली आहे. यातच कापूस बाजार कोरोनामुळे संकटात असून, शासकीय केंद्रात कापूस विक्रीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन कापूस खरेदी सुरू करण्याचा निर्णय खानदेश, मराठवाडा भागातील काही सीसीआयच्या केंद्रधारक जिनिंग प्रेसिंग कारखानदारांनी घेतल्याची माहिती आहे.  कापूस खरेदीचे केंद्र खासगी जिनींग प्रेसिंग कारखान्यात मंजूर करताना सप्टेंबरमध्ये सीसीआय व संबंधित कारखान्याचे संचालक, कारखानदारांमध्ये करार प्रक्रिया झाली होती. यात कापसाचा उतारा व घट याबाबततचे महिण्यागणिक वेगवेगळे निकष, अटी लावण्यात आल्या होत्या. यानुसार एप्रिल महिन्यात सुमारे साडेचौतीस टक्के उतारा व तीन टक्के घटीचा निकष आहे. म्हणजेच एक क्विंटल कापूस सीसीआयने निश्‍चित केलेल्या खरेदी केंद्रात किंवा जिनींग प्रेसिंग कारखान्यात खरेदी केल्यास त्यात साडेचौतीस क्विंटल रुई असावी. तसेच एकूण कापसात तीन किलो कापूस घटल्याचे गृहीत धरले जाईल. यापेक्षा अधिक घट आली व अपेक्षित उतारा न आल्यास येणाऱ्या नुकसानीस संबंधित जिनींग प्रेसिंग कारखान्याचे संचालक व केंद्र नियुक्त सीसीआयचे केंद्रप्रमुख जबाबदार असतील, असा हा निकष आहे.  परंतु सध्या उष्णतेमुळे हवी तेवढा उतारा येणार नाही व कापसात घट येईल. यामुळे सीसीआयच्या केंद्रधारक कारखानदारांचे नुकसान होईल. या करारात आता बदल करा, त्यानंतर सीसीआयची कापूस खरेदी सुरू करू, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन व खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनने घेतली होती. आपल्या अडचणींबाबत दोन्ही संघटनांनी सीसीआयच्या मुंबई कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राला सीसीआयने उत्तर दिले असून, त्यात झालेल्या करारात आता बदल करणे शक्‍य नाही. शेतकरी, सीसीआयला केंद्रधारकांनी सहकार्य करावे, असा मुद्दा सीसीआयने उपस्थित केला आहे.  यावर ज्या केंद्रधारक कारखानदारांना निर्देशीत घट व उताऱ्याच्या निकषानुसार कापूस खरेदी परवडेल त्यांनी खरेदी सुरू करावी, असे आवाहन कारखानदार असोसिएशनने केले आहे. यानुसार खानदेश व मराठवाडा भागातील काही केंद्रधारक कारखानदार कापूस खरेदीसंबंधी तयार झाले आहेत. खानदेशात पुढील आठवड्यात सीसीआयच्या नऊपैकी चार केंद्रांमध्ये कापूस खरेदी सुरू होणार आहे. मजूर उपलब्ध झाले तर आणखी इतरही केंद्र सुरू होवू शकतील, अशी माहिती असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com