चार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’, अशी एक म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे.
अॅग्रो विशेष
शेतीप्रश्न सोडविण्याची केंद्राची इच्छा नाही : अण्णा हजारे
दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार व आंदोलक यांच्यात नऊ बैठका झाल्या, तरीही आंदोलनात तोडगा निघाला नाही.
नगर ः दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार व आंदोलक यांच्यात नऊ बैठका झाल्या, तरीही आंदोलनात तोडगा निघाला नाही. याचा अर्थ, सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आस्था नसून, ते सोडविण्याची इच्छाशक्तीच नसल्याचे दिसते, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. आंदोलक व सरकारमध्ये नऊ बैठका झाल्या; मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती दिली. याबाबत बोलताना हजारे म्हणाले, ‘‘इतका दीर्घ काळ शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यात लहान मुले, महिला व वृद्ध व्यक्तींचाही समावेश असल्याचे पाहून सरकारने तोडगा काढणे गरजेचे होते. मात्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आस्था दिसत नाही.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक नसल्याचे दिसते. सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, राज्याच्या कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, अशा माझ्या मागण्या आहेत. याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकरीहितासाठी दिल्लीत आंदोलन करणार आहे. आंदोलनाचे ठिकाण व वेळ लवकरच जाहीर करीन.
‘‘मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे. दिल्ली येथे आंदोलनासाठी जागा मिळण्याकरिता दिल्ली निगमकडे तीन पत्रे पाठवून परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप ती मिळाली नाही. लवकरच आंदोलनासंदर्भात पुढील दिशा व नियोजनासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे,’’ असेही हजारे म्हणाले.