दुष्काळी स्थितीची पाहणी करताना केंद्रीय पथक
दुष्काळी स्थितीची पाहणी करताना केंद्रीय पथक

बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकापुढे मांडल्या व्यथा

बदनापूर, जि. जालना : जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी (ता. ५) बदनापूर तालुक्‍यातील जवसगावला भेट दिली. अवघ्या वीस मिनिटांच्या दौऱ्यात पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाण्याअभावी सुकून गेलल्या तूर, कापूस व बाजरी या पिकांची पाहणी केली.

या पथकात केंद्रीय निती आयोगाचे सल्लागार मानष चौधरी, पाणीपुरवठा व स्वछता मंत्रालयातील सचिव एच. सी. शर्मा व कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांचा समावेश होता. जवसगाव येथील महिला शेतकरी सुवर्णा सुखदेव अंभोरे यांच्या शेताला पथकाने भेट दिली. कुठले पीक आहे? कधी लागवड केली होती? पिकाची अवस्था कशी आहे? पाऊस किती झाला? पिकांना पाणी देण्यासाठी पावसाव्यतिरिक्त इतर स्रोत आहेत का? मागील वर्षी किती उत्पन्न झाले होते? पीक लागवडीसाठी काय खर्च लागला? किती उत्पन्न झाले अथवा अपेक्षित आहे? किसान क्रेडिट कार्ड आहे का? पीकविमा काढलाय का? मागच्या वेळी पीकविम्याचा मोबदला मिळाला का? पीककर्ज घेतले काय? थकीत कर्ज आहे का? असे प्रश्न पथकाने शेतकऱ्यांना विचारले. या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे पथकाला समजून सांगितले.

शेतकरी अंभोरे म्हणाल्या, की यंदा आम्ही तूर, कापूस, बाजरी पिकांची लागवड केली होती. मात्र संपूर्ण हंगामात दोन-तीन वेळाच पाऊस झाला. पावसाअभावी खरीप पिके पुरती जळून गेली. मागील वर्षीच्या तुलनेत दहा टक्केदेखील उत्पन्न मिळाले नाही. जमिनीत ओल नसल्यामुळे रब्बी पीकही घेता येणार नाही.

जालना तालुक्‍यातील बेथलम या गावाला भेट देऊन प्रकाश जयसिंग निर्मळ आणि दयानंद साळवे या दोन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. जवसगाव येथे केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी हिंदी भाषेतून संवाद साधला. त्यामुळे गोंधळलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न हिंदी व इंग्रजीतून मांडण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी केला. बिनवडे यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत जालना जिल्ह्याला पुरस्कार मिळाल्याचे सांगत, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी जागरूक झाले आहेत. त्यामुळे पीकविमा योजनेला प्रतिसाद मिळत आहे, असे स्पष्ट केले.

या पथकातील अधिकाऱ्यांना आंतरपिकातील मटकीची पाहणी केली. मात्र मटकी म्हणजे नेमके काय हे उमजत नव्हते. रामदास पाटील यांनी इंग्रजीतून मटकीचा अर्थ पथकातील अधिकाऱ्यांना सांगितला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com