`यंदा देव कामी आला नाही, तुम्ही तरी काही करा`

सहा एकर जमीन टेंभापुरी प्रकल्पात गेल्याने भूमिहीन झालो. शासनाने जमीन देऊ केली, पण अजून दिलेली नाही. मुलांचे शिक्षण कसे करावे, हा प्रश्न आहे. - दिनकर ढोले , प्रकल्पग्रस्त, टेंभापुरी.
दुष्काळी स्थितीची पाहणी करताना केंद्रीय पथक
दुष्काळी स्थितीची पाहणी करताना केंद्रीय पथक

औरंगाबाद : पहिले बी एकदा पथक आले होते. चौकशी करून दोन महिने झाले, पण काही झालं नाही. आता तुम्ही आलात, यंदा देव कामी आला नाही; तुम्ही तरी काही करा. गावात प्यायला पाणी नाही, शासन एका व्यक्‍तीला २० लिटर पाणी देतं. गाव हागणदारीमुक्‍त झालयं, पण पाणी नाही. त्यामुळे एका व्यक्‍तीला किमान ४० लिटर पाणी मिळायला हवं. चार वर्षांपासून टॅंकरने पाणी पुरवलं जातेय. सरकारचे लोक म्हणतात चारा उपलब्ध आहे; पण खरंच चारा उपलब्ध नाही, पाणीही नाही. म्हणून विनंती करतो, जसं प्यायला माणसी पाणी देता, तसं रेशनकार्डाचा कोणताही भेदभाव न करता धान्य द्या. गंगापूर तालुक्‍यातील मुरमीचे सरपंच विक्रम राऊत पोटतिडकीनं गावातील दुष्काळाची व्यथा, त्यावर होत असलेले उपाय, नेमकी गरज कशाची, हे केंद्रीय पथकासमोर मांडत होते.

राज्य शासनाने दुष्काळासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर केंद्राचे पथक मंगळवारी (ता.४) राज्यात दाखल झाले. दहा सदस्यीय पथकाचे तीन गट केल्यानंतर ते बुधवारी (ता.५) राज्यातील विविध भागांत दुष्काळ पाहणीसाठी पाठविण्यात आले. विदर्भ, मराठवाडा व खानदेशात पाहणी करणाऱ्या दोन पथकांनी औरंगाबाद येथून दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. पहिले पथक केंद्रीय सहसचिव छवी झा यांच्या नेतृत्वात औरंगाबाद व जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी, तर दुसरे पथक जालना व बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. तत्पूर्वी औरंगाबाद विभागीय आयुक्‍तालयात केंद्राच्या पथकाने आढावा बैठक घेतली.

या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील दुष्काळी स्थितीचे सादरीकरण केले. त्यानंतर  पुणे, औरंगाबाद व नाशिक विभागीय आयुक्‍तांनी आपल्या विभागातील दुष्काळी स्थितीचे सादरीकरण केले. त्यानंतर केंद्रीय सहसचिव छवी झा, सीडब्ल्यूसीचे श्री. देशपांडे, भोपाळच्या कडधान्य विभागाचे संचालक ए. के. तिवारी, एमएनसीएफसीच्या डॉ. शालिनी सक्‍सेना आदींनी औरंगाबाद जिल्ह्यातील टेंभापुरी प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकूण घेत, त्यांच्या दुष्काळाच्या अनुषंगाने मागण्या व त्यानुसार उपाययोजनांविषयीची मते जाणून घेतली.

या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, गंगापूर तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्‍के आदी उपस्थित होते. टेंभापुरी प्रकल्पग्रस्तांनी ११ मागण्यांचे निवेदन केंद्रीय पथकाला सादर केले.

त्यानंतर पथकाने मुरमी येथील शेतकरी यदो पुंजाराम निळ यांच्या कपाशीच्या शेताला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. एकरात कपाशी लावली, पण केवळ एक क्‍विंटल कापूस झाल्याचे श्री. निळ यांनी सांगितले. त्यानंतर सुलतानपूर व जिकठाण शिवारातील शे. युनूस शे. चांद व शे. बाबुलाल शे. अहमद यांच्याशीही पथकाच्या सदस्यांनी संवाद साधला. पाहणी झाल्यावर आम्ही केंद्र सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे सहसचिव झा यांनी सांगितले. सकाळी ११ ते १.३० वाजेदरम्यान अत्यंत जलदगतीने पथकाने निवडक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती संकलन केले.

‘दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही’ टेंभापुरीचा प्रकल्प निर्मितीनंतर आजपर्यंत फक्‍त दोन वेळा भरला. कोट्यवधी रुपये खर्च झालेल्या जवळपास २९ गावांच्या पाणीपुरवठा योजना गत आठ वर्षांपासून बंद आहेत. शिवाय आम्हाला प्यायला पाणी नाही. पैसे असणारे विकत घेतात, ज्यांच्याकडे नाहीत त्यांना अधिग्रहीत विहिरीतून मिळणारे खारे, दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही, असे टेंभापुरीचे विलास खवले, रामनाथ ढोले, अशोक ढोले यांनी सांगितले.   ‘आम्हाला सांभाळा; जनावरांना सांभाळा’ प्यायला पाणीच नाही, जारचं पाणी प्यायला घ्यावं लागतं. १९७९ पासून टेंभापुरी प्रकल्प फक्‍त दोन वेळा भरला. पावसाअभावी, मका जळून गेला. कपाशीला फक्त दोन, तीन कैऱ्या आल्या. नागझरी नदीवरील टेंभापुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात भरपूर कोल्हापुरी बंधारे झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पात गंगेतून वा इतर ठिकाणाहून पाणी वळतं केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आंदोलनं केली, पण आजवर उपयोग झाला नाही. त्यामुळं आता केंद्राच्या पथकाला ''आम्हाला सांभाळा, जनावरांना सांभाळा'', एवढी विनंती करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बद्रिनाथ ढोले, कल्याणराव ढोले, दिनकर ढोले, रामनाथ ढोले, अशोक ढोले, विलास खवले, शेषराव गुंजाळ यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com